Authors
Claim
मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे.
Fact
धार्मिक द्वेष पसरविण्यासाठी बनावट खात्याद्वारे असा प्रकार झाला असून असा फतवा कुणीही काढलेला नाही.
मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. आम्हाला व्हाट्सअपवर हा दावा मोठ्याप्रमाणात पसरविला जात असल्याचे दिसून आले.
“तमाम मुसलमान भाईयो से इल्तिजा है हिंदू कोफिर बस्ती व गांवो, इलाको मे कैमिकल्स मिलाकर घटिया क्वालिटी के फल, सब्जी, दुध, पनीर, आईसक्रीम आदि चीजे बेंचे ताकि कोफिर जमात व इनके बच्चे भारी तादाद मे बिमारी की गिरफ्त मे आऐ – फरमान मदरसा दारूल उलम देवबंद” असा मजकूर आम्हाला या दाव्यामध्ये वाचायला मिळाला.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) हा दावा प्राप्त झाला असून तथ्य तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact check/ Verification
व्हायरल दाव्यामध्ये एका स्क्रीनशॉटचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. हा स्क्रिनशॉट पूर्वीच्या ट्विटर आणि सध्याच्या X वरील पोस्टचा असल्याचे आणि मौलाना गयूर शेख नावाच्या युजरने ही पोस्ट २८ फेब्रुवारी २०२० रोजी केलेली असल्याचे दिसून आले. यावरून आम्ही संबंधित पोस्ट X वर उपलब्ध आहे का? याचा शोध घेतला. मात्र आम्हाला संबंधित अकाउंट डिलीट करण्यात आले असल्याचे लक्षात आले.
दरम्यान २०२० पासूनच ही पोस्ट आणि तिचा स्क्रिनशॉट इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आमच्या निदर्शनास आले. ४ मार्च २०२१ रोजी हिन्दू राष्ट्र संघ या पेजने संबंधित स्क्रिनशॉट शेयर केला होता, अशी माहिती आम्हाला मिळाली.
संबंधित खात्याची संग्रहित आवृत्ती उपलब्ध आहे का? याचा आम्ही शोध घेतला असता आम्हाला web.archive.org वर @gayur_sheikh या खात्याने पूर्वी केलेल्या असंख्य पोस्टचे संग्रहण उपलब्ध असल्याचे दिसून आले.
येथे उपलब्ध काही संग्रहित पोस्ट पाहिल्या असता, या खात्याने याचप्रकारच्या अनेक पोस्ट केल्या होत्या, ज्या धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या आणि व्याकरणाच्या असंख्य चुका असणाऱ्या होत्या हे आमच्या निदर्शनास आले. अशा काही संग्रहित पोस्टच्या लिंक येथे, येथे, आणि येथे पाहता येतील. अशा पोस्टचे स्क्रीनशॉट्स खाली दिले आहेत.
यावरून संबंधित अकाऊंटवरून अशाप्रकारे अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या, हे लक्षात येते. व्हायरल पोस्टमध्येही व्याकरणाच्या दृष्टीने असंख्य चुका असल्याची बाब आमच्या लक्षात आली. ‘काफिर’ ऐवजी ‘कोफीर’ लिहिल्याचे दिसून येते. इतर पोस्टमध्ये सुद्धा समान चुका पाहायला मिळता. दरम्यान संबंधित खात्याने आपल्या बायोमध्येही असंख्य चुका केल्याचे खालील स्क्रीनशॉटवरून दिसून येते.
मुस्लिमांनी केमिकल मिश्रित पदार्थांची विक्री करण्याचे फरमान मदरसा दारूल उलम देवबंद यांनी काढल्याचा उल्लेख व्हायरल दाव्याच्या अखेरीस आम्हाला पाहायला मिळाला. यावरून आम्ही शोध घेतला असता, उत्तरप्रदेश येथील देवबंद येथे दारुल उलूम हे प्रसिद्ध विद्यापीठ असल्याची माहिती मिळाली. इस्लामिक शिक्षण देणाऱ्या या केंद्राच्या संकेतस्थळावर आम्ही शोध घेतला आणि असा कोणता फतवा काढण्यात आला आहे का? याची पाहणी केली. मात्र तसे आढळले नाही.
आम्ही संबंधित संस्थेचे मीडिया प्रभारी अशरफ उस्मानी यांच्याशी संपर्क साधून या व्हायरल दाव्याची सत्यता विचारली. “ही खोटी पोस्ट यापूर्वी अनेकदा व्हायरल झाली आहे. मी याआधी अनेकवेळा याचे खंडन केले आहे आणि हे खरे नाही हे दाखवून दिले आहे. आम्ही असा कोणताही फतवा जारी केलेला नाही.” असे ते म्हणाले.
यावरून धार्मिक द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने केलेली खोटी पोस्ट अनेक वर्षांपासून व्हायरल होत असल्याचे आणि प्रत्यक्षात असा फतवा कोणीही दिलेला नसल्याचेच स्पष्ट होते.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे असे सांगणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
Result: False
Our Sources
Google Search
Archived posts on web.archive.org
Search on darululoom-deoband.com
Conversation with Media In-Charge of Darul Uloom Educational Institute
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा