Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन...

फॅक्ट चेक: अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय? खोटा आहे हा दावा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय.
Fact

सुमारे अडीज वर्षे जुना व्हिडीओ प्रसारित करून खोटा दावा केला जात आहे. नाशिक पोलिसांनी दाव्याचे खंडन केले असून कारवाईचा इशारा दिला आहे.

अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय असे सांगणारा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे. पाचवेळा होणाऱ्या अजानच्या आधी आणि नंतर भजन आणि कीर्तनावर नाशिक येथे मज्जाव केला जात आहे असे एका पोलीस अधिकाऱ्याकडून सांगितले जात असलेला हा व्हिडीओ आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

“अजून झोपा, आता नाशिकमधून आदेश आला आहे. सनातनी, येत्या काळात संपूर्ण भारतात हेच होणार आहे, तुम्ही झोपून राहा, मतदान करू नका आणि तुमच्या मुलांचे आणि कुटुंबाचे भविष्य अंधकारमय करा, झोपून रहा.” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी बोलत आहे, “जे सकाळी पाच वाजता, दुपारी सव्वा एक वाजता, संध्याकाळी सव्वापाच आणि साडेसहा आणि रात्री साडेआठ… अशा पाच अजान वेळा असतात. त्या आधी आणि नंतर पंधरा मिनिटे आणि मशिदीच्या शंभर मीटरच्या परिघात कोणतेही भजन, कीर्तन किंवा हनुमान चालीसा करण्याचा अधिकार नाही.”

फेसबुकवर असंख्य युजर्सनी हा दावा पोस्ट केला आहे.

Instagram वरही आम्हाला हा दावा पाहायला मिळाला.

फॅक्ट चेक: अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय? खोटा आहे हा दावा

X वरही काही यूज़र्सनी हा दावा शेयर केला आहे.

अशा दाव्यांचे संग्रहण येथे, येथे आणि येथे पाहता येईल.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय? खोटा आहे हा दावा

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला २० एप्रिल २०२२ रोजी फेसबुकवर Shaik sameer reportor या युजरने केलेली एक पोस्ट मिळाली. यामध्येही व्हायरल दाव्यातील क्लिप आम्हाला पाहायला मिळाली. बोलत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव दीपक पांडे असे असल्याचे आणि संबंधित अधिकारी नाशिकचे पोलीस आयुक्त असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय? खोटा आहे हा दावा

विशेष म्हणजे या पोस्टमध्ये NBT News असा लोगो आम्हाला आढळला. यावरून तपास करता आम्हाला नवभारत टाइम्स (NBT) ने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर १८ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित केलेला एक व्हिडीओ रिपोर्ट आम्हाला मिळाला. “महाराष्ट्रातील अजानवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले की, मशिदीच्या १०० मीटर परिसरात अजानच्या १५ मिनिटे आधी आणि नंतर हनुमान चालीसा किंवा भजन वाजवण्यास परवानगी दिली जाणार नाही. ते म्हणाले, “हनुमान चालीसा किंवा भजन वाजवण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. अजान आधी आणि नंतर १५ मिनिटांच्या आत परवानगी दिली जाणार नाही. मशिदीच्या १०० मीटरच्या आत परवानगी दिली जाणार नाही. या आदेशाचा उद्देश कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा आहे.” असे रिपोर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्हाला वाचायला मिळाले.

यावरून संबंधित आदेश २०२२ मध्ये नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी तत्कालीन अजान आणि हनुमान चालिसा प्रकरणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जारी केला होता. अशी माहिती आम्हाला मिळाली. यासंदर्भात इतर माध्यमांनी सुद्धा प्रसिद्ध केलेल्या १८ एप्रिल २०२२ रोजीच्या बातम्या आम्हाला पाहायला मिळाल्या. यापैकी आजतक आणि abp न्यूज ने दिलेल्या बातम्या खाली पाहता येतील.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी आम्ही नाशिक पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधला. तेथे आम्हाला माहिती मिळाली की “सध्या असा कोणताही आदेश नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेला नाही. २०२२ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी हा आदेश काढला होता. तर सध्याचे आयुक्त संदीप कर्णिक आहेत. सध्या यासंदर्भात पसरत असलेले व्हायरल दावे खोटे आहेत. खोटी माहिती प्रसारित केली जात असून अशा सोशल मीडिया युजर्सवर कारवाई केली जात आहे.”

दरम्यान आम्ही नाशिक पोलिसांनी दाव्याचे खंडन करणारे १५ ऑक्टोबर २०२४ रोजी केलेले ट्विट सुद्धा खाली जोडत आहोत. “व्हाट्सअ‍ॅपवर काही समाजकंटकांनी चुकीच्या उद्देशाने मुद्दाम एक २.५ वर्षे जुना व्हिडिओ संपादित करून त्यात एका अधिकाऱ्याचे पद नाशिक पोलिस आयुक्त म्हणून दाखवले होते आणि हा व्हिडिओ काल एका वापरकर्त्याने X (अगोदरचे ट्विटर) वर पोस्ट केला. या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे ; व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” असे यामध्ये म्हटलेले आहे.

अजान आणि हनुमान चालिसाचा मुद्दा काय आहे?

एप्रिल २०२२ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर वाजवल्या जाणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून तत्कालीन उद्धव ठाकरे प्रणित महाविकास आघाडी सरकारला भोंगे हटविण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर ठिकठिकाणी हनुमान चालीसा म्हणणे आणि लावण्याचे प्रकार सुरु झाल्यानंतर पोलीस दलासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी नाशिक येथील तत्कालीन आयुक्त दीपक पांडे यांनी संबंधित आदेश दिल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा झाली होती. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून त्यांची बदली करण्यात आली. आजतक ने २८ एप्रिल २०२२ रोजी दिलेल्या बातमीनुसार त्यानंतर या पदावर दाखल झालेले पोलीस आयुक्त जयंत नायकनवरे यांनी संबंधित आदेश मागे घेतला होता. यासंदर्भातील माहिती येथे आणि येथे वाचता येईल.

फॅक्ट चेक: अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय? खोटा आहे हा दावा

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात २०२२ साली देण्यात आलेला आणि पुढे मागे घेण्यात आलेला तत्कालीन पोलीस आयुक्तांचा आदेश चुकीच्या संदर्भाने शेयर करून खोटा दावा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Facebook post made by user Shaik sameer reportor on April 20, 2022
News Report published by Navbharat Times on April 18, 2022
News published by Aaj Tak on April 18, 2022
News published by ABP News on April 18, 2022
Conversation with Police headquarter Nashik
Tweet made by Nashik City Police on October 15, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular