Authors
सोशल मीडियावर साम टीव्हीचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की,”अशा लोकांमुळेच मी कायम भावी ते भावीच राहिलो.” असं विधान शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासंबंधित केले आहे.
“जेव्हा तांदूळचोरापासून खूजलीवाल पर्यंत सगळे जण राष्ट्रपतीपदासाठी एकच नाव सुचवू लागतात !! साहेबांची प्रतिक्रिया” असं विपुल सुजाता अरविंद यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. ही पोस्ट फेसबुकवर अनेक युजरने शेअर केली आहे.
एक महिन्यापूर्वी शरद पवार यांचा एबीपी माझा वाहिनीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. त्यातच आता साम टीव्हीचा फोटो शेअर करत शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासंबंधितचे विधान केले आहे, असा दावा केला जात आहे.
Fact Check / Verification
शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासंबंधितचे हे विधान खरंच केले आहे का, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही “अशा लोकांमुळेच मी कायम भावी ते भावीच राहिलो” हे विधान गुगलवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला कोणतीही माहिती मिळाली नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे विधान शरद पवार यांनी केलेले नाही.
त्यानंतर आम्ही तो व्हायरल होणारा फोटो पुन्हा पाहिला. त्यावर साम टीव्हीचा लोगो होता. मग आम्ही साम टीव्हीच्या अधिकृत फेसबुक पानावर गेलो. तिथे आम्ही व्हायरल फोटो शोधण्याचा प्रयत्न केला. पण आम्हांला तो फोटो तिथे मिळाला नाही. पण आम्हांला त्याच्याशी अगदी मिळता-जुळता एक फोटो मिळाला.
साम टीव्हीच्या फेसबुक पानावर मिळालेला फोटो आणि व्हायरल फोटोची आम्ही तुलना केली. तेव्हा आम्हांला साम टीव्हीचा लोगो, शरद पवारांचा फोटो आणि त्यांचे खाली लिहिलेले नाव या तिन्ही गोष्टी सारख्याच दिसल्या.
पण आपण जर दोन्ही फोटो नीट पाहिले तर आपल्याला समजेल की, व्हायरल फोटोतील आणि मूळ फोटोतील फॉन्ट हा वेगळा आहे. तसेच मूळ फोटोत विधानाच्या आधी दुहेरी अवतरण चिन्ह आहे, पण ते व्हायरल फोटोत नाही. यावरून स्पष्ट होते की, हा फोटो एडिटेड आहे.
१४ जून २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या साम टीव्हीच्या बातमीनुसार, आपण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.
या व्यतिरिक्त आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितले,”शरद पवार साहेबांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.”
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासंबंधितच्या केलेल्या विधानाचा व्हायरल होणारा साम टीव्हीचा फोटो एडिटेड आहे. शरद पवार यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.
Result : Manipulated Media/Altered Photo/Video
Our Sources
३१ मे २०२२ रोजी साम टीव्हीने अपलोड केलेला फोटो
१४ मे २०२२ रोजी साम टीव्हीने प्रकाशित केलेली बातमी
फोनवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्याशी झालेला संपर्क
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.