Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
Fact
हा दावा खोटा आहे. संबंधित वृत्ताचे खंडन करून संपादक आणि बातमीदाराविरोधात शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे.
सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय, असा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. X आणि Facebook वर हा दावा केला जात आहे.
दावा करताना दैनिक लोकवार्ताच्या नावाचे न्यूजपेपर कटिंग जोडण्यात येत आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी ‘जिहादी हृदयसम्राट’ या कॅप्शनखाली हा दावा शेयर केला आहे. तर अनेक युजर्स “तो हिंदू असुच शकत नाही…स्वतःच्या राजकीय भाकरी भाजण्यासाठी काँग्रेसला, पवारांना, अखिलेश यादवला, ममता बॅनर्जींला मुस्लिम लोकांचे तळवे चाटण्याची सवय आहेच. परंतु ज्याने छत्रपतींचे नव घेत, मीच हिंदूंचा कैवारी असल्याचे सांगत आजवर हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक केली तो उध्दव ठाकरेही त्यातलाच निघाला. हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. आज हा मुस्लिम मतांसाठी उघडपणे हिंदूंच्या विरोधात बोलतो. मुस्लिम समाजाचे तळवे चाटतो. आणि हे प्रत्येक हिंदूला दिसत असतानाही जर हिंदू याला, याच्या उमेदवारांना, याच्या आघाडीला मतदान करणार असतील तर ते हिंदू असुच शकत नाही. उबाठा गटाचा एकही उमेदवार विजयी होणार नाही याची प्रत्येक हिंदूने काळजी घ्यायला हवी.” या कॅप्शनखाली हा दावा करीत आहेत.
दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
मुंबई येथील तळोजा विभागातील पंचानंद हाईट्स सोसायटीत सर्वच सण सार्वजनिक पातळीवर साजरे करण्यावर बंदी घालण्यात आलेली होती. यावरून दिवाळीत रोषणाई करण्यास विरोध झाला. या घटनेला जोडून उद्धव ठाकरे यांच्या नावाने हा दावा केला जात असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा दावा राजकीय रंग देऊन केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
संबंधित व्हायरल दाव्यामध्ये दैनिक लोकवार्ताच्या नावाचे न्यूजपेपर कटिंग जोडले आहे. आम्ही संबंधित दैनिकाच्या सोशल मीडिया खाती किंवा इंटरनेट आवृत्ती सापडतात का? याचा शोध घेतला. मात्र आम्हाला यश आले नाही. संबंधित न्यूजपेपर कटिंगमध्ये असलेले वृत्त आम्ही काळजीपूर्वक वाचले. दरम्यान शीर्षक आणि आतील मजकूर यामध्ये आम्हाला विसंगती आढळली. शीर्षकामध्ये “सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको” असे लिहून त्यापुढे उबाठा असे लिहिण्यात आले आहे. मात्र आतील मजकुरात त्यांनी असे कुठे आणि कधी म्हटले याचा उल्लेख नाही. यामुळे या वृत्तावरून काहीच स्पष्ट झाले नाही.
दरम्यान आम्ही संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून Google वर शोध घेतला. मात्र उद्धव ठाकरे यांनी असे विधान केल्याची बातमी कोठेच प्रसिद्ध झाल्याचे आम्हाला आढळले नाही. इतके मोठे विधान केले असते तर त्याबद्दल मोठी बातमी झाली असती.
दरम्यान आम्ही यासंदर्भात कुठल्या माध्यमातून वृत्त मिळाले हे दैनिक लोकवार्ता कडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित वृत्तपत्राचा संपर्क क्रमांक किंवा संबंधित बातमीला ज्यांचे नाव आहे ते पत्रकार उत्तम पाटील यांचा क्रमांक उपलब्ध होऊ न शकल्याने आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही.
आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर धुंडाळले, मात्र तेथेही आम्हाला अशी कोणतीच माहिती मिळाली नाही. याप्रकारचा आदेश काढण्यात आल्याचे ट्विट किंवा पोस्ट आम्हाला दिसली नाही.
आणखी शोध घेताना आम्हाला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर देणारे ट्विट आढळले. १ नोव्हेंबर २०२४ रोजी केलेल्या या ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘Fake News Samrat’ असे म्हटले आहे.
“@MaharashtraSEC आणि @ECISVEEP याकडे लक्ष देऊन चौकशी करतील का? वारंवार खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल त्यांनी या उमेदवाराला अपात्र ठरवावे.” अशी मागणीही त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केली आहे. यावरून संबंधित दावा खोटा असल्याचे आणि शिवसेनेने त्याचे खंडन केले असल्याचे दिसून आले.
आणखी शोध घेत असताना Shiv Vidhi Nyay Sena(Maharashtra). Shivsena UBT या शिवसेनेच्या न्याय कक्षाने केलेले १ नोव्हेंबर २०२४ रोजीचे ट्विट आम्हाला मिळाले.
“शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चुकीची माहिती छापल्याबद्दल दैनिक लोकवार्ता प्रकाशन, संपादक व उत्तम पाटील पत्रकार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत शिव विधी व न्याय सेनेने प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.” असे त्यात म्हटले आहे.
आणखी खात्री करून घेण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेथेही आम्हाला हा दावा खोटा असल्याची माहिती मिळाली. “उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही आदेश काढलेला नसताना जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे.” असे सांगण्यात आले.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको असा आदेश उद्धव ठाकरे यांनी असे सांगणारे पेपर कटिंग आणि दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Self Analysis
Google Search
Tweet made by MP Priyanka Chaturwedi on November 1, 2024
Tweet made by Shiv Vidhi Nyay Sena(Maharashtra). Shivsena UBT on November 1, 2024
Conversation with office of Shivsena UBT
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
April 12, 2025
Prasad S Prabhu
April 11, 2025
Prasad S Prabhu
January 10, 2025