Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Marathi
महाराष्ट्रात आणि देशात सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दोन पाऊले पुढे गेले आहेत. “आता हिरव्या चादरीची नाही तर भगव्याची फॅशन आहे. मशीद, मजार आणि दर्ग्यालाही जावे लागले तर जय श्रीराम म्हणा…. सनातनी हिंदू परंपरे प्रमाणे आता अशा ठिकाणीही आरती होईल.” असा दावा करीत एक व्हिडीओ प्रसारित केला जात आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका प्रार्थनास्थळामध्ये भगवी चादर चढविताना आणि आरती करून हिंदू पद्धतीप्रमाणे पूजा करताना दिसून येतात.
या दाव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. येथे मुख्यमंत्र्यांनी चादर चढविली तर तो मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ असलेला मशीद किंवा दर्गा आहे का? की हिंदू पद्धतीने आरती झाली म्हणजे ते हिंदुंचे कोणते प्रार्थनास्थळ आहे का? की दोन्ही धर्मांचे आदरस्थान आहे? दाव्यात म्हटल्याप्रमाणे एकाद्या धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही या एक्सप्लेनर च्या माध्यमातून करणार आहोत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्ग्यावर भगव्या रंगाची चादर चढविली आणि आरती केली असा दावा ज्या ठिकाणाबद्दल केला जात आहे, ते ठिकाण नेमके कोणते आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. यासाठी आपल्या सर्व उपक्रमांची माहिती समाजमाध्यमांवर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर आम्ही शोध घेतला. आम्हाला त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर खात्यांवर ५ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या एका कार्यक्रमाबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्याचे निदर्शनास आले.
व्हायरल दाव्यामधील व्हिडीओ आणि मुख्यमंत्र्यांनी शेयर केलेल्या दोन पोस्ट मधील इमेजीस यांची तुलना केल्यावर युजर्स ज्या कार्यक्रमाचा संदर्भ घेऊन दावा करीत आहेत, त्यासंदर्भातील कार्यक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून भाष्य केल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही या कार्यक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून काय दावा केला जातोय किंवा त्यांनी कोणती माहिती शेयर केली आहे. हे शोधले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विट मध्ये “#ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या #कल्याण येथील श्री मलंगगड यात्रेनिमित्ताने आज #श्री_मलंगगड येथे उपस्थित राहून श्री मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे पूजन अर्चन केले,” असे म्हटले आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरून आम्हाला “#ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या #कल्याण येथील श्री मलंगगड यात्रेनिमित्ताने आज #श्री_मलंगगड येथे उपस्थित राहून श्री मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे पूजन अर्चन केले. वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या श्री मलंग उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही अविरतपणे सुरू ठेवू असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच श्री मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले असल्याचे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या सहकार्याने विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत असेही यासमयी बोलताना नमूद केले. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ.बालाजी किणीकर, #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, सहकारी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते,” अशी माहिती वाचायला मिळाली.
यावरून ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या ठाणे जिल्ह्यातील मलंगगड याठिकाणी मच्छिन्द्रनाथांच्या समाधी मंदिरात हा कार्यक्रम झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. व्हायरल दाव्यात म्हटल्याप्रमाणे आम्हाला दर्गा किंवा मशिदीचा उल्लेख आढळला नाही. मात्र असा उल्लेख करून मलंगगडावर झालेल्या कार्यक्रमाला वेगळा संदर्भ कशासाठी दिला जात आहे? हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. यासाठी मलंगगड कुठे आहे? तेथे कोणते श्रद्धास्थान आहे आणि त्याबद्दल काही वेगळे समज किंवा वाद आहेत का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
मलंगगड संदर्भात गुगल मॅप च्या माध्यमातून आम्ही शोध घेतला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण जवळ असलेल्या या किल्ल्याची माहिती आम्हाला मिळाली. मॅप वरील सॅटेलाईट व्ह्युव सुद्धा पाहिला असता आम्हाला या गडावर काही धार्मिक स्थळे असल्याची आणि पारंपारिक गड असल्याची माहिती मिळाली.
आम्ही या गडासंदर्भात आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आम्हाला नवभारत टाइम्स ने प्रसिद्ध केलेले ३१ मार्च २०२१ चे एक वृत्त सापडले. मलंगगडावर २८ मार्च २०२१ रोजी उत्सवादरम्यान दोन धार्मिक गटात वाद झाल्याचे हे वृत्त सांगते.
“ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंदरनाथ यांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. ही बाजू सांगते की दरवर्षी पालखी निघते, रोज पूजा होते. नैवेद्य अर्पण केला जातो. तर दुसरीकडे १३व्या शतकात येमेनहून आलेले सुफी संत सूफी फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ मलंग बाबा यांची ही कबर असल्याचे दुसरी बाजू मानते.
दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. 80 च्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे,” असे हे वृत्त सांगते.
तेहेलका आणि बीबीसी सारख्या नामांकित संस्थांनीही याच धर्तीवर वृत्त प्रकाशित केले होते.
त्यानंतर न्यूजचेकरने या प्रकरणाशी परिचित असलेले स्थानिक पत्रकार ऋत्विक भालेकर यांच्याशी संपर्क साधला. “मलंगगड हा कल्याण डोंबिवली या मतदारसंघात अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येतो. या ठिकाणाची ख्याती अशी आहे की, तेथे सर्वधर्मीय मोठ्याप्रमाणात जातात. तो दर्गा आहे म्हणून तेथे फक्त मुस्लिम समुदायच जातो असे काही नाही. असे अनेक दर्गे आहेत मुंबईमध्ये जेथे सर्वधर्मीय अनेक दशकांपासून भक्तिभावाने जात आले आहेत. अशीच ख्याती मलंगगड ची सुद्धा आहे” असे त्यांनी सांगितले.
या वादात महत्वाची भूमिका शिवसेनेचे तत्कालीन नेते आनंद दिघे यांनी घेतली होती. यामुळे या वादात सुरुवातीपासून असलेले आणि शिवसेनेच्या पहिल्या काळापासून सक्रिय असलेले नेते रवी कपोते यांच्याकडून आम्ही माहिती जाणून घेतली. ” मुख्यमंत्र्यांनी समाधीवर भगवी शाल किंवा चादर चढविली असेल तर त्यात काहीही चूक नाही. ते देवस्थान हिंदूंचं आहे असा दावा चालू आहे आणि ते हिंदूंचंच आहे. तेथे कोणत्या रंगाची चादर चढवावी असा कोणताही नियम नाही. समाधी मंदिराच्या बाहेर एक स्थंभ आहे. तेथे नवस बोलले जातात आणि ते पूर्ण झाल्यावर हिरव्या कापडाचा ध्वज चढविला जातो. मात्र त्याठिकाणी नवस पूर्ण झाला म्हणून भगवा ध्वज चढविला तरी कुणी अडथळा करीत नाही. आपण स्वतः तसे केलेले आहे. समाधीवर मुख्यमंत्र्यांनी चादर चढविली आहे आणि त्यात काहीच गैर नाही. याठिकाणी दरवर्षी माघी पौर्णिमेला आरती केली जाते. १९८८ पासून जेंव्हा आंदोलन सुरु झालं, तेंव्हापासून आनंद दिघेंपासून आरती केली जाते. त्यांच्या निधनानंतर खंड पडेल असा संभव होता त्यामुळे आपण स्वतः जाऊन तेथे शिवसैनिकांसोबत आरती केली असून परंपरा खंडित पाडू दिलेली नाही. या समाधीच्या ठिकाणी चोवीस तास दिवा तेवत असतो आणि तेथे भेट देणारे मुस्लिम भाविक सुद्धा त्यामध्ये भक्तिभावाने तेल घालतात” असे त्यांनी सांगितले.
“कोणताही हिंदू याठिकाणाला दर्गा असे संबोधित नाही. याठिकाणी मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती येण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तेही येथे येऊन आरती करून गेले आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
एकूणच या गडावरील प्रार्थनास्थळावर हक्क हिंदूंचा की मुस्लिमांचा तसेच तेथे दर्गा की समाधी? यावरून संघर्ष होत आलेला असून न्यायालयीन लढाई सुरु असल्याची माहिती आमच्या निदर्शनास आली.
याचा शोध आम्ही घेतला असता, उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका, १७१८ हा अर्ज आणि ५०८/२०१५ हे तीन दावे प्रलंबित आहेत. तसेच १/१९८२चा खटला ठाणे कोर्टात प्रलंबित आहे. तसेच २/२००९ हा अर्ज ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. अशी माहिती आम्हाला मिळाली.
एकंदर न्यायालयीन वादाची पार्श्वभूमी शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.
या वादात सुरुवातीपासून असलेले आणि शिवसेनेच्या पहिल्या काळापासून सक्रिय असलेले नेते रवी कपोते यांच्याशी बोलताना आम्हाला बरीच माहिती मिळाली. “या प्रकरणात दाखल दावे नाथपंथाचे मदन बलकवडे हे पाहत आहेत. श्री मलंगगडावरील देवस्थान हे नाथपंथियांची दीक्षा गादी आहे. या ठिकाणी हिंदू येतातच, तसेच मुसलमानही भक्तीभावाने येत आहेत म्हणून गोपाळ कृष्ण केतकर यांनी १९५२ साली याची नोंदणी ‘श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा’ या नावाने केली. पेशवेकालीन इतिहास श्री मलंग गडाची नोंद आहे. त्यामध्ये श्री मलंग बाबा अशी नोंद सापडते,” असे त्यांच्याकडून समजले.
“मात्र कालांतराने या ठिकाणी मुसलमानांनी वर्चस्व दाखवणे सुरु केले. पूर्वापार हिंदू धर्म परंपरेने सुरु असलेल्या पूजाविधीवर मुसलमान आक्षेप घेऊ लागले, पुढे पुढे तर हिंदूंना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करू लागले. म्हणून मग हे देवस्थान मूलतः हिंदूंचेच आहे, असे सर्व ऐतिहासिक पुराव्यानिशी श्री अनंत गोखले यांनी १/१९८२ मध्ये ठाणे कोर्टात खटला दाखल केला आणि या देवस्थानाच्या ‘श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा’ या नोंदणीलाच आव्हान दिले आहे.“
उपलब्ध माहितीनुसार, “हा खटला चालवू नये म्हणून नासिर खान फाजल खान यांनी उच्च न्यायालयात ६५०९/२००२ याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने त्यांना परत खाली ठाणे कोर्टात पाठवले, जिथे अनंत गोखले यांचा खटला सुरु आहे. हा खटला न्यायप्रविष्ट असतानाही नासिर खान फाजल खान यांनी या देवस्थानाची गैरमार्गाने वक्फ बोर्डात नोंदणी करून घेतली. त्याला मदन बलकवडे यांनी ही नोंदणी चुकीची आहे म्हणून त्याविरोधात उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका दाखल केली. त्यात उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २००६ मध्ये वक्फ बोर्डाला या नोंदणीसाठी स्थगिती दिली. तसेच जोवर ठाणे कोर्टात प्रलंबित खटल्याचा निकाल लागत नाही, तोवर या देवस्थानाच्या कारभारात लक्ष घालण्यास पूर्ण मनाई केली.”
त्यानंतर नासिर खान फाजल खान यांनी २००९मध्ये पुन्हा एकदा हे देवस्थान वक्फमध्ये रजिस्टर केले. वक्फनेही ते रजिस्टर करून त्याला प्रमाणपत्रही दिले. त्यावर मदन बलकवडे यांनी अवमान याचिका ५०८/२०१५ उच्च न्यायालयात दाखल केली. ती अजून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच २/२००९ हा अर्ज ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामध्ये या देवस्थानावर विश्वस्त नेमण्याची मागणी केली आहे. हा अर्ज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने करण्यात आला आहे. अशीही माहिती आम्हाला मिळाली आहे.
जुन्या ब्रिटीश कालीन गॅझेट नुसार हा वाद सुरु आहे, अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्याची संग्रहित प्रत शोधली. तेथेही मलंगगड चा शोध कसा लागला यासंदर्भातील नोंदी आम्हाला पाहायला मिळाल्या. 1780 ते 1782 या काळामध्ये इंग्रज कल्याणला होते. त्यांना तेथून बाहेर काढण्यात पेशव्यांना यश आलं. हे यश मिळण्यामागे हाजी अब्द उल रहमानांची मदत झाली असं मानून पेशव्यांनी त्यांच्या कबरीसाठी चादर पाठवली. ही चादर घेऊन पेशव्यांतर्फे कल्याणचे ब्राह्मण काशीनाथपंत केतकर आले. याच केतकरांनी येथील कबरींचा जीर्णोद्धार केला. मुसलमान व्यक्तीची कबर असली तरी त्याकाळापासून या दर्ग्याची सर्व व्यवस्था काशीनाथपंत केतकर यांच्या कुटुंबाकडे आली. ती आजतागायत सुरू आहे. अशीही माहिती आम्हाला मिळाली.
इंडियन कानून या वेबसाईटवर या वादासंदर्भात सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्याची प्रक्रिया पाहायला मिळते. गोपाळ कृष्णाजी केतकर विरुद्ध महम्मद हाजी लतीफ यांच्यात झालेल्या न्यायालयीन लढ्याची पार्श्वभूमी येथे आणि येथे पाहता येईल.
हाजी मलंग दर्ग्याचे विश्वस्थ शौकत अन्सारी यांच्याशीही आम्ही बोललो. त्यांनी “याठिकाणी ८०० वर्षे जुना दर्गा असून त्याला हाजी मलंग यांचा दर्गा असे संबोधले जाते,” असे सांगितले. “या ठिकाणासंदर्भातील कोणतेही सरकारी रेकॉर्ड काढले तर त्यामध्ये पीर हाजी मलंग दर्गा असेच लिहिलेले आपल्याला दिसेल. १८७० च्या मुंबई गॅझेट मध्येही अशीच नोंद पाहायला मिळते. ठाणे सेशन कोर्टात यासंदर्भात दाखल दाव्यात गोखले नामक व्यक्तीने दर्गा असा उल्लेख रद्द करून मच्छिन्द्रनाथ समाधी अशी नोंद करण्याची मागणी केली होती. १३ जानेवारी २०२३ रोजी हा दावा न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. मात्र अद्याप त्याची सर्टिफाईड कॉपी मिळायची आहे.” असेही त्यांनी सांगितले. दरम्यान यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे उपलब्ध झाल्यावर हा लेख अपडेट केला जाईल.
ठाणे जिल्ह्यातील मलंगगड येथे असलेल्या प्रार्थनास्थळाला दर्गा म्हणायचे की समाधी यासंदर्भातील न्यायालयीन वाद अद्याप प्रलंबित आहे. तो वाद मिटल्याची कागदपत्रे अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. शिवसेना नेते किंवा हिंदू त्याला समाधी मानून १९८८ पासून आरती करीत आले आहेत. दरम्यान हा दर्गा असल्याचा मुस्लिम विश्वस्थांचा पावित्रा असून त्याबद्दल विविध मतप्रवाह आहेत. मात्र सर्व धर्मीय भाविक तेथे भक्तिभावाने जातात हा मुद्दाही महत्वाचा आहे. यामुळे तेथे करण्यात आलेल्या धार्मिक क्रियांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले असून आम्ही कोणत्याही धर्मियांच्या श्रद्धेबद्दल कोणतीही टिप्पण्णी या लेखात केलेली नाही.
Our Sources
Article published by BBC
Article published by Tehelka.com
Article published by Hindusthan post
Official website of Late. Anand Dighe
Tweet made by CM Eknath Shinde
Conversation with Journalist Hrutwik Bhalekar, Shivsena leader Ravi Kapote and Trustee of Durgah commitee Shoukat Ansary
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
February 26, 2025
Prasad S Prabhu
December 6, 2024
Prasad S Prabhu
December 7, 2024