Authors
Claim
हा मणिधरसन नावाचा चमत्कारिक सूर्योदय आहे जो हिमालयात पहाटे ३:३० वाजता होतो.
Fact
हा दावा खोटा असून व्हिडीओ हिमालयातील नव्हे तर स्वीडन येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा मणिधरसन नावाचा चमत्कारिक सूर्योदय आहे जो हिमालयात पहाटे ३:३० वाजता होतो. यात ३ नाड्या (इडा, पिंगळा, सुषमा) आहेत आणि त्याला वर्धमान असेही म्हणतात. याला भगवान शिवाचे विश्वरूप दर्शन असेही म्हणतात. असा दावा करीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
‘चमत्कारिक सूर्योदय आहे जो हिमालयात पहाटे ३:३० वाजता होतो’ यासंदर्भात न्यूजचेकरने किवर्ड सर्च करून पाहिला. इतक्या मोठ्या घटनेसंदर्भात आम्हाला कोणतेही मीडिया रिपोर्ट्स उपलब्ध झाले नाहीत.
दरम्यान आम्हाला कार्यकारी संचालकांचे विशेष सल्लागार | युरोपियन युनियन बौद्धिक संपदा कार्यालय (EUIPO) Jean Rodesch यांनी १३ जानेवारी २०१९ रोजी केलेले एक ट्विट मिळाले.
“ही एक नैसर्गिक घटना आहे ज्याला पॅराहेलिओ किंवा सन डॉग म्हणतात. जेव्हा ते अत्यंत थंड असते आणि चंद्र आणि सूर्याचे प्रभामंडल दिसतात तेव्हा हे घडते. स्वीडनमध्ये 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. Breath taking.” अशी कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली. या ट्विट मध्ये व्हायरल दाव्यात दिसणारा व्हिडीओ आम्हाला दिसला.
आम्ही व्हायरल व्हिडीओचे किफ्रेम्स काढून त्यासंदर्भात रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. आम्हाला १३ जानेवारी २०१९ रोजी @dharmeshshah9221 चॅनेलने युट्युबवर अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ मिळाला.
“ही #Parahelio किंवा #Sundog नावाची नैसर्गिक घटना आहे. जेव्हा वातावरण अत्यंत थंड असते आणि #चंद्र आणि सूर्याचे प्रभामंडल दिसतात तेव्हा हे घडते. हे #स्वीडन मध्ये घडले.” असे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचायला मिळाले.
आम्हाला शोधताना independent ने प्रसिद्ध केलेले ३ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध केलेले एक वृत्त सापडले. यामध्येही स्वीडन मध्ये घडणाऱ्या या घटनेबद्दलची माहिती मिळाली.
शोध घेत असताना आम्हाला NASA ने याबद्दल दिलेली माहिती आम्हाला २३ ऑगस्ट १९९९ रोजी प्रसिद्ध केलेल्या लेखात वाचायला मिळाली. या घटनेला SunDog असे म्हणत असल्याचे आम्हाला यातून समजले.
नासाने १ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या आर्टिकल मध्ये यासंदर्भातील व्हिडिओही प्रसिद्ध केला असून त्याची माहिती दिली आहे.
नासाने स्पष्ट केले की “वातावरणात पाणी गोठल्यानंतर तयार होणारे लाखो बर्फाचे स्फटिक आहेत. हे स्फटिक अतिशय लहान असून त्यांना सहा बाजू आहेत. काही काळ जमिनीवर पडताना या स्फटिकांचा चेहरा सपाट आणि जमिनीला समांतर राहतो. या वेळी, हे स्फटिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यप्रकाशाचे अपवर्तन करणारे सूक्ष्म लेन्स म्हणून कार्य करतात आणि लोकांना दृश्यमान असलेली ही घटना तयार करतात. या घटनेला परहेलिया किंवा सन डॉग्स असे संबोधले जाते.”
मणीदर्शन काय आहे?
तसेच, हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगेत वसलेल्या मनीमहेश शिखरावरील सूर्योदयाचे अनेक व्हिडिओ YouTube वर आहेत. जेव्हा सूर्य शिखराच्या टोकावर असतो आणि भगवान शिवाच्या मुकुटावर हिऱ्याचा ठसा उमटवतो तेव्हा चमत्कारिक दृश्य दिसते. त्याला अनेकजण मणीदर्शन असे संबोधतात. मात्र व्हायरल व्हिडिओतील दृश्यात आणि या दृश्यात फरक आहे.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल केला जाणारा व्हिडीओ हिमालयात घडणाऱ्या चमत्कारिक सूर्योदयाचा नसून तो जुना स्वीडिश व्हिडीओ असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.
Result: False
Our Sources
Tweet made by Jean Rodesch on January 13, 2019
Video uploaded by @dharmeshshah9221 On January 13, 2019
Article published by independent On December 3, 2017
Article published by NASA On August 23, 1999
Article published by NASA on January 1, 2018
Video uploaded by HImalaya Treks On Suptember 10, 2019
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in