Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkसंपूर्ण महाराष्ट्राला शीतलहरींचा धोका? दिशाभूल करणारा आहे हा मेसेज

संपूर्ण महाराष्ट्राला शीतलहरींचा धोका? दिशाभूल करणारा आहे हा मेसेज

उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे. रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे. याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे, शरीर लुळे पडणे, पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. असे सांगणारा एक मेसेज सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअप वरून या मेसेज चे प्रसारण होत असून काळजी घेण्याची सूचना केली जात आहे.

Whatsapp viral message

जाहिर आवाहन “सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे. रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे. याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे, शरीर लुळे पडणे, पक्षाघात, ब्रेनहॅमरेज, रक्तवाहिन्या गोठणे, हार्टअटॅक, मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर, कानटोपी, रग यांचा वापर करावा.” “सतर्क रहा, सावधान रहा जनहितार्थ जारी!! महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग” असे हा मेसेज सांगतो. अनेकजण हा मेसेज फॉरवर्ड करू लागले आहेत.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact check/ Verification

आम्ही या व्हायरल मेसेजची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. हा दावा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याच्या नावे करण्यात आला असल्याने आम्ही शासकीय आरोग्य विभागाने अशी कोणती सूचना दिली आहे का? याची पडताळणी करून पाहिली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आम्ही पाहणी केली असता असे कोणतेही जाहीर प्रकटन आमहाला दिसले नाही.

हा विषय हवामानातील बदलांशी संबंधित असल्याने आम्ही हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळालाही भेट दिली. मात्र अशी कोणतीही जाहीर सूचना भारतीय हवामान खात्याच्या मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रातील केंद्राने दिल्याचे आम्हाला जाणवले नाही. आम्ही किवर्ड सर्च च्या माध्यमातून ‘महाराष्ट्राला शीतलहरींचा धोका’ यासंदर्भात शोध घेतला. मात्र नवी कोणतीच माहिती मिळाली नाही. आम्हाला Zee चोवीस तास ने नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध केलेली ‘उत्तर भारत थंडीने गारठला मात्र महाराष्ट्रात थंडी ओसरली’ अशा आशयाची बातमी मिळाली, मात्र त्यात व्हायरल मेसेज मध्ये वर्तविलेला धोका पाहायला मिळाला नाही.

उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींचा दक्षिणी राज्यांवर काही परिणाम होतोय का? हे पाहण्यासाठी आम्ही किवर्ड सर्च केले. आम्हाला Live Mint ने प्रकाशित केलेले एक वृत्त सापडले. यामध्ये शीतलहरींनी उत्तर भारत गारठला असून त्याचा फटका गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर तसेच मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश आदी राज्यांना कसा बसणार आहे याची माहिती वाचायला मिळते. मात्र महाराष्ट्रातील तापमान अतिशय खाली उतरले किंवा उतरणार आहे, याबद्दल पुष्टी देणारे कोणतेही मजकूर सापडले नाहीत.

Screengrab of Live Mint

या मेसेज संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आयएमडी, मुंबई चे प्रमुख सुनील कांबळे यांच्याशी संपर्क साधला. “असे मेसेज येणे हे प्रभाव आधारित आहे. देशाच्या एका भागासाठी जारी करण्यात आलेले संदेश भाषांतरित करून इतर भागात पाठविले जातात. उत्तर भारतातील परिस्थितीवरून हे मेसेज पसरले जात आहेत, दरम्यान नागरिकांनी चिंता किंवा भय बाळगण्याची गरज नाही.” अशी माहिती त्यांनी दिली.

आयएमडी मुंबईच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी आम्हाला उत्तर भारतातील स्थिती आणि त्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम याची तांत्रिक माहिती दिली. “आम्ही सध्यातरी उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा धोका संपूर्ण महाराष्ट्राला होणार असे म्हणू शकत नाही. कारण तसे अपेक्षित नाही. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग येथील तापमान १० अंश सेल्सियस पेक्षा खाली जाऊ शकेल, तशी शक्यता आहे. पण ते ६ जानेवारीला नव्हे तर ९ किंवा १० जानेवारीला तशी परिस्थिती येऊ शकते. ही परिस्थिती दरवर्षीच निर्माण होते. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात असे घडणे हे नेहमीच म्हणजे दरवर्षी घडत असते. ही नेहमीची आणि सवयीची बाब आहे. दरवर्षी हिवाळ्यात १२ ते १३ अंशापर्यंत तापमान खाली घसरणे हे या भागासाठी सवयीचे आहे. नाशिक आणि मराठवाडा येथील तापमान खाली येणे किंवा मुंबईचे तापमान किमान १६ ते १८ अंशापर्यंत खाली येणे असे घडते आणि घडत आलेले आहे. याबद्दल चेतावणी देण्यासारखे काहीच नाही” असे त्या म्हणाल्या.

“डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील तापमान ९ अंशापर्यंत खाली गेलेले आहे. ३१ डिसेंबर च्या मध्यरात्री आणि पहाटे मुंबईतील तापमान १६ अंशापर्यंत खाली घसरले होते. इतर भागात ते पुन्हा खाली घसरू शकते. यामुळे याबद्दल भीती बाळगण्याची किंवा चेतावणी देण्याची कोणतीही आवश्यकता नाही.” असे त्यांनी सांगितले.

व्हायरल मेसेज मध्ये थंडी वाढून अनेक गंभीर आजार होऊ शकतील असा उल्लेख आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी के एल ई इस्पितळाचे प्रथितयश डॉक्टर आणि जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. माधव प्रभू यांच्याशी आम्ही संपर्क साधला. “मानवी शरीर हे सर्व प्रकारचे बदल पचविण्याची क्षमता राखते. शरीरात थर्मोस्टॅट शरीराचे तापमान बाहेरील परिस्थिती अर्थात तापमानाशी जुळवून घेण्यासाठी मदत आणि कार्य करतात. अचानक जास्त थंडी पडली म्हणून शरीराला अचानक कोणतेही त्रास होत नाहीत. त्यामुळे अकारण घाबरून जाणे चुकीचे आहे.” असे त्यांनी सांगितले. “हवामानात घट होण्याची प्रक्रियाही अशी अचानक होत नाही. कोणत्याही भागात १ अंशाने तापमान घटायचे असल्यास त्यास तीन दशकांचा कालावधी लागतो. त्यामुळे कोणीही असा समज करून घेण्याची गरज नाही.” असेही त्यांनी सांगितले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात, व्हायरल मेसेज मधील मजकूर दिशाभूल करून भीती बाळगणारा आढळला. शीतलहरींचा फटका बसून हवामान कमी होण्याची प्रक्रिया महाराष्ट्रातील सर्व भागासाठी धोकादायक नाही. काही भागात असे दरवर्षी घडते. याबद्दल चेतावणी देणारा मेसेज सरकारी पातळीवर देण्यात आलेला नाही आणि थंडी पडल्यास मानवी शरीराला अचानक मोठे अपाय होऊ शकत नाहीत. हे स्पष्ट झाले आहे.

Result: False


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular