Authors
Claim
महाराष्ट्रातील नाशिक रोड रेल्वेस्टेशनवर कुत्र्यांचे 500 किलो मांस पकडले गेले.
Fact
सदर छायाचित्रे २०१८ मधील चेन्नई येथील घटनेची आहेत. नाशिकमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही.
महाराष्ट्रातील नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कुत्र्यांचे 500 किलो मांस पकडले गेले आहे. असा दावा सध्या व्हायरल होत आहे.
“नाशिकरोड स्टेशनमध्ये आज ५०० किलो कुत्रा मांस जप्त केले. हे सर्व ढाबा रेस्टॉरंट्स आणि हॉटेलसाठी दररोज आधारीत होते. मुंबई, नवी मुंबई, व इतर भागात देखील पुरवठा होतो रेस्टॉरंट यादी लवकरच बाहेर होईल कृपया मांसाहारी अन्न टाळा.. हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट मध्ये कुत्र्यांचे मटन हॉटेल ढाबा, व बाहेर कुठेही मांसाहार खाणे टाळा.” असे हा दावा सांगतो.
आम्हाला आमच्या Whatsapp टिपलाइनवर (9999499044) हा दावा प्राप्त झाला असून, त्याची तथ्य तपासणी करण्याची विनंती केली आहे.
Fact Check/ Verification
Whatsapp वर हा संदेश मोठ्या वेगाने शेअर केला जात आहे. दाव्यामध्ये एक छायाचित्र आहे. ज्यात समोर पोत्यांमध्ये भरलेले काही साहित्य आणि पोलीस व इतर व्यक्ती दिसत आहेत. दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही व्हायरल छायाचित्रावर गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. आम्हाला 18 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली टाइम्स ऑफ इंडियाची एक बातमी सापडली.
बातमीनुसार, भगत की कोठी-मन्नारगुडी ट्रेन चेन्नईच्या एग्मोर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर थांबली, जिथे काही थर्माकोलचे डबे बाहेर ठेवले होते. काही वेळाने डब्यांमधून दुर्गंधी येऊ लागली, पलीकडे गस्त घालणाऱ्या आरपीएफ जवानांचे लक्ष त्या दुर्गंधीकडे गेले, त्यानंतर जवानांनी केलेल्या तपासणीनंतर त्या डब्यांमध्ये गोठलेले कुत्र्याचे मांस सापडले. बातमीसोबत घटनेचा व्हिडिओही पाहता येईल.
तपासादरम्यान आम्हाला दैनिक भास्करच्या वेबसाईटवरही समान माहिती देणारी माहिती मिळाली.
“ही घटना 17 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता चेन्नई येथील एग्मोर रेल्वे स्थानकावर घडली. जेथे शहराच्या अन्न सुरक्षा विभागाच्या लोकांना आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी बोलावले. त्यानंतर 11 थर्माकोल बॉक्समधून कुत्र्याचे मांस जप्त करण्यात आले.” अशी माहिती आम्हाला मिळाली.
यानंतर शोध घेताना आम्हाला द न्यूज मिनिट ने 22 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केलेले एक वृत्त पाहायला मिळाले. त्यामध्ये “कुत्र्याचे मांस सापडल्याच्या घटनेच्या पाच दिवसांनंतर अन्न सुरक्षा अधिकार्यांनी शोध घेऊन जप्त केलेले मांस मेंढ्या किंवा शेळीचे मांस असल्याचे उघड झाले आहे. तामिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या रिपोर्टनुसार, 17 नोव्हेंबर रोजी त्यांना मांस सुपूर्द करण्यात आले आणि त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी मांसाच्या प्रजाती ओळखण्यासाठी विनंती पत्र देण्यात आले. एकूण शारीरिक वैशिष्ट्यांच्या अभ्यासासाठी एक आण्विक तंत्र वापरण्यात आले आणि ते मेंढी किंवा शेळीचे मांस आहे हे स्पष्ट झाले.” असा मजकूर आढळला.
दरम्यान मांस सापडल्याची घटना घडली होती, मात्र तपासणीअंती ते मांस कुत्र्याचे नसून शेळी किंवा मेंढी यांचेच असल्याचे स्पष्ट झाले होते. हे आमच्या निदर्शनास आले.
Conclusion
अशाप्रकारे मांस सापडण्याची घटना पाच वर्षांपूर्वी चेन्नई येथे घडल्याचे, या घटनेशी महाराष्ट्राच्या नाशिक चा काहीच संबंध नसल्याचे आणि सापडलेले मांसही कुत्र्याचे नसल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
News published by Times of India on November 18, 2018
News published by Dainik Bhaskar
News published by The News Minute on November 22, 2018
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in