Authors
Claim
मराठी तरुणाईने ही संधी सोडू नका, भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत.
Fact
हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असून अनेक वर्षांपासून सोशल माध्यमांवर फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत, मराठी तरुणाईने ही संधी सोडू नका. असे सांगणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे. आम्हाला हा मेसेज व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात घिरट्या घालत असल्याचे दिसून आले.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
“मराठी तरुणाईने ही संधी सोडू नये… B.Sc. (फिजिक्स, मॅथेमॅटिक्स) कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर (कमीत कमी ६०% टक्के मार्क) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी. भारतीय सागरी हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी जाहिरात, एकूण ९९० पदे, मराठी मुलांच्या निदर्शनास ही जाहिरात आणावी. फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. AII india posting असते. पण साधारण ३ वर्षांनंतर आपले चॉईस स्टेशन मिळते. दक्षिण व उत्तर भारतातील अनेक मुलं ही परीक्षा आवर्जुन देतात व त्यामुळे त्यांची भरती मोठ्या संख्येने होते. त्यासाठी ही जाहिरात जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहचवा. नम्र विनंती आहे की, अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षेला बसावे. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ची अधिकृत वेबसाईट : https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp” असे हा मेसेज सांगतो.
Fact Check/Verification
मेसेजची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्यातील मजकूर पूर्णपणे वाचला. आम्हाला मेसेजच्या खाली https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp ही लिंक दिसली. आम्ही त्या लिंकवर जाऊन पाहिले. दरम्यान आम्हाला सदर लिंक ESSO अर्थात Indian National Centre for Ocean Information Services च्या वेबसाईटची असल्याचे दिसून आले. संबंधित खाते भारत सरकारच्या भू शास्त्र विभागाची एक यंत्रणा असल्याचे आणि समुद्री माहिती सेवा या वर्गात समाविष्ट असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावरून मेसेजमध्ये देण्यात आलेली लिंक भारतीय सागरी हवामान खात्याची नसल्याचे प्राथमिक तपासातच स्पष्ट झाले.
संबंधित विभागाने कोणती भरती प्रक्रिया सुरु केली आहे का? हे शोधण्यासाठी आम्ही वेबसाईटच्या vacancy सदरात जाऊन पाहिले. दरम्यान ९९० पदांच्या मेगा भरतीसंदर्भात आम्हाला कोणतीच माहिती मिळाली नाही.
Indian National Centre for Ocean Information Services च्या वेबसाईटवर पाहिले असता आम्हाला या संस्थेचे कार्यालय हैद्राबाद येथे असल्याचे समजले. आम्ही संस्थेच्या अधिकृत टेलिफोन क्रमांकावर संपर्क साधला असता, आम्हाला तेथे संपर्क प्रमुख कुमार हे भेटले. त्यांना संबंधित मेसेज संदर्भात विचारले असता, “हा मेसेज अनेकवर्षांपासून सोशल मीडियावर फिरत असून तो दिशाभूल करणारा आहे. संस्थेला आवश्यक पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते, मात्र ९९० पदांच्या या भरतीबद्दल संस्थेने कोणतीच जाहिरात प्रसिद्धीला दिली नसून हा प्रकार खोटा आहे.” असे त्यांनी सांगितले.
यावरून व्हायरल मेसेज खोटा असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत, असे सांगणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Self Analysis
Official Website of ESSO
Conversation with Mr. Kumar, PRO, ESSO
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा