Authors
Claim
उमेदवाराच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना सभेत बोलण्यापासून रोखण्यात आले.
Fact
हा दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावे असा आग्रह केला जात असतानाचा व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. राष्ट्रीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. याचक्रमाने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक दावा केला जात आहे. एक व्हिडीओ शेयर करून हा दावा केला जात असून उद्धव ठाकरे यांना उमेदवाराच्या प्रचारादरम्यान बोलू दिले नाही असे हा दावा सांगतो.
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
अनेक X युजर्सनी हा दावा केला असून “अरे व्हागाची काय हालत झाली..बोलू द्या रे..” असे लिहिले आहे. अशा पोस्ट खाली पाहता येतील.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्याच्या चौकशीसाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला २२ एप्रिल २०२४ रोजी ABP माझा ने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ रिपोर्ट सापडला.
“उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर पहिला वार” असे शीर्षक असलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला व्हायरल व्हिडिओतील भाग पाहायला मिळाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण पाहायला मिळाले. सुरुवातीला उद्धव ठाकरे हे अमरजी चांगले बोलताहेत असे म्हणत असताना त्यांना आजूबाजूचे लोक थांबवत तुम्ही बोला असे सांगतात. त्यानंतर भाषण सुरु होते. हे पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये व्हिडीओचे लोकेशन दाखवताना वर्धा असा उल्लेख आढळला.
यावरून सुगावा घेऊन आम्ही किवर्ड सर्चच्या माध्यमातून “उद्धव ठाकरे- वर्धा-प्रचार-भाषण” असे शोधले असता, आम्हाला लोकसत्ताने २२ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी पाहायला मिळाली.
“महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज रात्री हिंगणघाट येथे सभा संपन्न झाली. या सभेचे मुख्य आकर्षण हे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हेच होते. मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित शरद पवार यांना नऊचे विमान नागपुरातून पकडायचे होते. त्यामुळे प्रथम त्यांचे नंतर अमर काळे यांचे व मग ठाकरे यांचे भाषण असा क्रम होता. दरम्यान काहींची भाषणे लांबल्याने उद्धव ठाकरे यांना अमर काळे यांचे भाषण थांबवून बोलण्याची विनंती करण्यात आली. मात्र ठाकरे यांना दुसऱ्या सभेला जायचे असल्याने आपण कमी बोलतो, अशी विनंती केली. त्यावेळी आपण बोलाच अशी विनंती त्यांना करण्यात आली.” अशी माहिती आम्हाला मिळाली.
“कार्यक्रमाचे नियोजन चुकले, भाषणे लांबली आणि उद्धव ठाकरेंना बोलण्याची विनंती करण्यात आली.” हे आम्हाला वाचायला आणि पाहायला मिळाले. मात्र उद्धव ठाकरे यांना बोलू दिले नाही किंवा बोलताना रोखण्यात आले, असे कुठेही आम्हाला आढळले नाही.
आणखी शोध घेताना आम्हाला “वर्ध्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेत काय घडलं?” या शीर्षकाखाली Saam TV ने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर याच कार्यक्रमासंदर्भात अपलोड केलेला व्हिडीओ रिपोर्ट पाहायला मिळाला. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये “महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. वेळेअभावी त्यांना लवकर निघावं लागलं, पण एका कृतीने त्यांनी अनेकांची मनं जिंकली.” असे लिहिण्यात आले आहे.
“उमेदवार अमर काळे यांचे भाषण थांबवून बोलावे लागत आहे, मात्र माझे भाषण संपल्यावर निघून जाऊ नका.” असे आवाहन करून उद्धव ठाकरेंनी उपस्थितांची मने जिंकली. असे अँकरने सांगितल्याचे आम्हाला ऐकायला मिळाले.
@ShivsenaUBTComm या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या X खात्याने उद्धव ठाकरे यांनी संबंधित जाहीर सभेत केलेले भाषण पोस्ट केले आहे. @NCPspeaks या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या X खात्यावरही उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा काही भाग पोस्ट केला आहे. तर @NCPspeaks या पक्षाच्या युट्युब चॅनेलवर जाहीर सभा Live करण्यात आली होती. यामध्ये १ तास ३५ मिनिटे २६ सेकंदानंतर उद्धव ठाकरे यांचे नाव पुकारले जाण्यापासून पुढे त्यांचे भाषण होईपर्यंतचा संपूर्ण भाग पाहता येईल.
यावरून मध्ये बोलण्यास स्वतः आक्षेप घेऊन उद्धव ठाकरेंनी उमेदवार अमर काळे यांना मान दिल्याचे आणि त्यांना बोलण्यासाठी स्वतः उमेदवार अमर काळे यांनीही विनंती केल्याचे दिसून आले आहे. उद्धव ठाकरे यांना भाषण करण्यापासून रोखले गेल्याचा प्रकार कुठेच पाहायला मिळाला नाही.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात उमेदवाराच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना सभेत बोलण्यापासून रोखण्यात आले, हा दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावे असा आग्रह केला जात असतानाचा व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल केला जात आहे. हे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Video uploaded by ABP MAJHA on April 22, 2024
News published by Loksatta on April 22, 2024
Video uploaded by Saam Tv on April 23, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा