Authors
Claim
काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत 8,500 रुपये मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांचा व्हिडिओ.
Fact
हा दावा खोटा आहे. हा चार वर्षे जुना व्हिडीओ जन धन योजनेच्या लाभार्थ्यांचा आहे जे बँकेबाहेर रांगेत पैसे काढण्यासाठी थांबले आहेत.
काँग्रेस पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते की, त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला 1 लाख रुपये म्हणजे दरमहा सुमारे 8500 रुपये दिले जातील.
4 जून रोजी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालात काँग्रेस 99 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष बनला असून एनडीएने तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या महिला काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत 8500 रुपये मिळण्याची वाट पाहत असल्याचा दावा करत महिलांच्या लांबलचक रांकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
10 जून 2024 रोजीच्या पोस्टच्या (संग्रहण) मथळ्यात असे लिहिले आहे की, “राहुल गांधी… इन भिखारीयो को 8500 खटाखट खटाखट दो… धूप में क्यों मार रहे हो… जो वादा किया है उसे खटाखट खटाखट पूरा करो”
Fact Check/Verification
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला, व्हिडिओमध्ये सर्व महिला एकमेकांपासून काही अंतर राखून वेगळ्या वेगळ्या वर्तुळात उभ्या आहेत. कोरोनाच्या काळात असा नियम पाळण्यात आल्याने, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सध्याच्या असण्याबद्दल आम्हाला शंका आली.
आता आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा Google रिव्हर्स इमेज सर्च केला. दरम्यान, आम्हाला हा व्हिडिओ 17 एप्रिल 2020 रोजी RB News नावाच्या YouTube चॅनेलवरून प्राप्त झाला. यावरून हा व्हिडिओ अलीकडील नसल्याचे स्पष्ट होते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मुझफ्फरनगरच्या गांधी कॉलनीतील मुस्लिम महिलांची रांक असे वर्णन केले आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला बँक ऑफ बडोदा लिहिलेले दिसत आहे आणि रांकेच्या बरोबरीने ठिकठिकाणी मुझफ्फरनगर लिहिलेले दिसत आहे.
यातून एक संकेत घेऊन आम्ही Google वर संबंधित कीवर्ड शोधले. याचा परिणाम म्हणून आम्हाला 20 एप्रिल 2020 रोजी न्यूज 18 ने या व्हिडिओवर प्रकाशित केलेला रिपोर्ट मिळाला. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील बँक ऑफ बडोदा बाहेर जमा झालेल्या गर्दीचा आहे, जिथे लोक त्यांच्या जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी पोहोचले होते. लोकांमध्ये अफवा पसरल्यानंतर हा जमाव बँकेसमोर जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. लोकांनी त्यांच्या जन-धन खात्यात जमा केलेले 500 रुपये काढले नाहीत, तर सरकार ते परत घेईल, अशी अफवा पसरली होती. नंतर प्रशासनाने लोकांना समजावून सांगितले की ही केवळ अफवा आहे, त्यानंतर लोकांना त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले.
Conclusion
तपासातून हा व्हायरल व्हिडिओ चार वर्षे जुना असल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचलो. या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आलेली नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसविरोधात खोटा प्रचार केला जात आहे.
Result: False
Sources
Video shared by Youtube channel RB News on 17th April 2020.
News report by News 18 on 20th April 2020.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा