Authors
Claim
राज्यसभेत मराठीत बोलल्याने मेधा कुलकर्णींना प्रियांका चतुर्वेदींनी रोखले.
Fact
हा दावा खोटा आहे. दुसऱ्या खासदाराने लक्षवेधी मांडल्याने काहीवेळ मेधा कुलकर्णी यांचे भाषण थांबवून पुढे ते पुन्हा करू देण्यात आले आहे. येथे मराठी बोलण्याचा मुद्दा चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल केली जात आहे.
राज्यसभेत मराठीत बोलल्याने मेधा कुलकर्णींना प्रियांका चतुर्वेदींनी रोखले, असे सांगणारा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात राज्यसभेच्या कामकाजादरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.
या अधिवेशनादरम्यान चतुर्वेदी राज्यसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवत असताना पाहायला मिळतात. दरम्यान मेधा कुलकर्णी बोलत असताना त्यांना प्रियांका चतुर्वेदी थांबवताना दिसतात. हा व्हिडीओ शेअर करून, “मराठी समजत नाही का सहन होत नाही? राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांचे अर्थसंकल्पीय चर्चेवरील भाषण अर्ध्यावर तोडून उपराष्ट्रपतींच्या खुर्चीत बसलेल्या प्रियांका चतुर्वेदी नेमके काय सिद्ध करू पाहात आहेत?” असा दावा करण्यात येत आहे.
Fact Check/Verification
Newschecker ने व्हायरल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. दरम्यान यामध्ये आपण मराठीत बोलू नका असे म्हणत प्रियांका चतुर्वेदींनी मेधा कुलकर्णींना थांबविल्याचे आम्हाला ऐकायला मिळाले नाही.
यासंदर्भात तपास करण्यासाठी आम्ही सदर राज्यसभा अधिवेशनाचा दीर्घ व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला Sansad TV च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर २५ जुलै २०२४ रोजी अपलोड केलेला दीर्घ व्हिडीओ मिळाला.
कुलकर्णीच्या भाषणाच्या दीर्घ आवृत्तीत, चतुर्वेदी त्यांना सुरुवातीलाच मला मराठी समजते, असे सांगताना आढळतात. या व्हायरल क्लिपमध्ये चतुर्वेदी, AAP खासदार राघव चड्ढा यांनी मांडलेल्या पॉइंट ऑफ ऑर्डरला संबोधित करण्यासाठी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणताना दिसत आहेत ज्यानंतर त्या कुलकर्णींना त्यांचे भाषण सुरू ठेवण्यास सांगतात. आम्हाला आढळले की ०.४३ सेकंदावर चतुर्वेदी म्हणतात की त्यांना मराठी समजते.
त्यानंतर, आम्ही भाषणाच्या दीर्घ आवृत्तीमध्ये व्हायरल व्हिडिओचा भाग शोधून काढला. १७:४३ मिनिटांनी, चतुर्वेदी कुलकर्णी यांना रोखतात आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेबद्दल बोलू नका केंद्रीय अर्थसंकल्पावर बोला असे सांगतात. त्यावर कुलकर्णी या मी बजेटवरच बोलत असल्याचे उत्तर देतात. यादरम्यान चतुर्वेदी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा संदर्भ देत) “प्रफुल्ल जी..कृपया बसा, मिस्टर पटेल…” असे म्हणतानाही ऐकू येतात.
या चकमकीत आप खासदार राघव चड्ढा हे एक लक्षवेधी मांडतात. हे १८:३४ मिनिटांनी पाहिले जाऊ शकते. यावेळी चतुर्वेदी यांनी कुलकर्णी यांना थांबण्यास सांगितले. लक्षवेधी ऐकल्यानंतर १९:१९ मिनिटांनी त्यांनी भाजप खासदार कुलकर्णी यांना “त्यांचे भाषण सुरू ठेवण्यास सांगितले” असल्याचे ऐकायला मिळते. कुलकर्णींच्या भाषणाच्या कालावधीत कुठेही चतुर्वेदी त्यांच्या मराठीत बोलण्यावर आक्षेप घेताना ऐकू येत नाहीत.
सदर भाषणाचा आणि त्यामध्ये झालेल्या गोंधळाचा पूर्ण व्हिडीओ खाली पाहता येईल.
एकंदर गोंधळ आणि व्हायरल दाव्यावर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही आपले म्हणणे मांडले आहे. आपल्या X खात्यावर, चतुर्वेदी यांनी त्याच दाव्याला उत्तर दिले आणि लिहिले, “डॉ. मेधा कुलकर्णी आणि रजनी पाटील जी दोघेही मराठीत बोलले आणि समोरच्या रांगेत बसलेल्या त्यांच्या मित्राने अनेकवेळा अडथळा निर्माण करून त्यांना बसायला सांगितले. हा अपमान ठरतो.”
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी X वर आपले भाषण पोस्ट केले आहे, परंतु मराठीत बोलण्यासाठी व्यत्यय आणल्याबद्दल काहीही सांगितले नाही.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात, राज्यसभेत मराठीत बोलल्याने मेधा कुलकर्णींना प्रियांका चतुर्वेदींनी रोखले हा दावा खोटा आहे. हे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या खासदाराने लक्षवेधी मांडल्याने काहीवेळ मेधा कुलकर्णी यांचे भाषण थांबवून पुढे ते पुन्हा करू देण्यात आले आहे. येथे मराठी बोलण्याचा मुद्दा चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल केली जात आहे.
Result: Missing Context
Our Sources
Video published by Sansad TV on July 25, 2024
Tweet made by MP Priyanka Chaturvedi on July 26, 2024
Tweet made by MP Medha Kulkarni on July 25, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा