Authors
Claim
गुजरातमध्ये गेल्या 5 वर्षात 41000 महिला बेपत्ता झाल्या असा NCRB चा धक्कादायक अहवाल आला आहे.
Fact
एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या 5 वर्षांत बेपत्ता झालेल्या 41,621 महिलांपैकी 39,497 महिलांना गुजरात पोलिसांनी परत आणले आहे.
वादाच्या भोवऱ्यात प्रदर्शित झालेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहत असतानाच गुजरातमध्ये ही घटना घडल्याचा दावा करत एक न्यूज पेपर कटिंग व्हायरल होत आहे. एका वृत्तपत्राच्या कटिंगवर छापलेल्या मथळ्यात असे लिहिले आहे की “गुजरातमध्ये गेल्या 5 वर्षांत 40,000 महिला बेपत्ता झाल्या, धक्कादायक NCRB अहवाल” सोशल मीडियावर बरेच युजर्स वेगवेगळ्या मजकूरासह न्यूज पेपरचे कटिंग शेअर करत आहेत. काही दाव्यात 41,000 महिला असा उल्लेखही पाहायला मिळत आहे.
याच क्रमाने, आम आदमी पार्टी गुजरातने देखील ट्विटरवर “भ्रष्ट भाजपच्या राजवटीत गुजरातमध्ये 41,000 महिला बेपत्ता” या शीर्षकासह एक वृत्तपत्र शेअर केले आणि व्यंग्यात्मक लिखाण करून गुजरातच्या भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, गुजरात पोलिसांनी हे दावे पोकळ असल्याचे स्पष्ट केले आहे.
Fact Check / Verification
गुजरातमध्ये गेल्या 5 वर्षात 41,000 महिला बेपत्ता झाल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल पोस्टसाठी गुगल सर्चमध्ये 8 मे रोजी गुजरात पोलिसांच्या अधिकृत अकाउंटवरून ट्विटरवर पोस्ट केलेले ट्विट दिसते. येथे गुजरात पोलिसांनी व्हायरल बातम्यांबद्दल स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की “ही माहिती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे.”
या ट्विट मध्ये गुजरात पोलीस पुढे म्हणतात की, “2016-2020 या वर्षात गुजरातमधून 41,621 महिला बेपत्ता झाल्या होत्या. परंतु यापैकी 39497 महिला (94.90%) परत सापडल्या आहेत आणि त्या त्यांच्या कुटुंबियांकडे आहेत. हे दोन्ही आकडे NCRB ने प्रकाशित केले आहेत. जे NCRB च्या पोर्टलवर तपासले जाऊ शकतात.”
या संदर्भात, आम्ही 2016 ते 2020 पर्यंत एनसीआरबीने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीच्या संदर्भात तपास सुरू केला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये 7,105 महिला बेपत्ता झाल्या, त्यापैकी 6,105 महिला पुनर्प्राप्त झाल्या. 2017 मध्ये 7,712, तर 8481 महिला परत आल्या. 2018 मध्ये 9,246 आणि 2019 मध्ये 9,268 महिला बेपत्ता झाल्या, त्यापैकी 8570 आणि 8547 महिला सापडल्या. तर 2020 मध्ये 8,290 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून 7753 महिलांचा शोध लागला आहे.
या व्हायरल बातमीबाबत गुजरातचे एडीजीपी नरसिंह कौमर यांची TV9 Gujarati वाहिनीने मुलाखत घेतली होती. ही मुलाखत यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. येथील एडीजीपी यांनी व्हायरल झालेल्या बातम्या निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावले आणि सांगितले की एनसीआरबीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीसह परत आणलेल्या महिलांचे आकडेही दिले होते, त्यानुसार गुजरात पोलिसांनी 41621 महिलांपैकी 39497 महिलांना परत आणले.
Conclusion
गुजरातमध्ये गेल्या 5 वर्षांत 41000 महिला बेपत्ता झाल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल झालेल्या एका वृत्तपत्राच्या कटिंगमध्ये अपूर्ण माहिती आणि दिशाभूल करणारे दावे शेअर करण्यात आले आहेत. NCRB डेटाद्वारे केलेल्या दाव्यावर गुजरात पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या 5 वर्षांत बेपत्ता 41621 महिलांपैकी 39497 महिलांना गुजरात पोलिसांनी परत आणले आहे.
Result: Missing Context
Our Sources
Official Tweet made by Gujarat Police on May 8, 2023
NCRB Crime Data 2016 to 2020
YouTube Video uploaded by TV9 Gujarati on May 9, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in