Authors
Claim
भारतीय संविधान आणि लोकशाहिवर विश्वास नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Fact
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील संदर्भ बदलून हा दिशाभूल करणारा दावा केला जात आहे.
भारतीय संविधान आणि लोकशाहिवर विश्वास नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असे सांगत त्यांच्या भाषणातील एक भाग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला जात आहे. दावा आहे की, “धक्कादायक! आरएसएस चे बोल फसनवीस तोडूंन बाहेर आले… सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ पहावा… आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये पाठवावा..देशद्रोह कौन करीत आहे बघावे”
आम्हाला हा दावा फेसबुक आणि X या माध्यमांवर सुमारे १४ सेकंदांचा व्हिडीओ शेयर करीत करण्यात आला असल्याचे आढळले.
व्हायरल दाव्याच्या व्हिडिओमध्ये “भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही. भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही. भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही, आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचं आहे.” असे म्हणताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐकू येतात. दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्याच्या चौकशीसाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. यात देवेंद्र फडणवीस विधानसभेत भाषण करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावरून संबंधित कीवर्ड वापरून आम्ही शोध घेतला असता, बीबीसी ने २० डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी आम्हाला मिळाली. या बातमीत देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांशी संबंधित विषयावर बोलताना हे विधान केल्याची माहिती आम्हाला मिळाली.
“विधानसभेत भाषण देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनांचा समावेश आहे, असा आरोप यावेळी केला.” अशी माहिती बीबीसीच्या बातमीत आम्हाला मिळाल्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे नक्षलवाद याविषयावर विधानसभेत झालेले भाषण शोधण्यास सुरुवात केली.
TV 9 मराठी या वृत्तवाहिनीने १९ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या युट्युब चॅनेलवर प्रसारित केलेले ते भाषण आम्हाला मिळाले. “Devendra Fadnavis Vidhan Sabha Full Speech | CM देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेतील पहिले भाषण” या सदराखाली हे भाषण झाल्याचे शीर्षकात म्हटले आहे. या भाषणात ३७ मिनिटे १२ सेकंदांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हायरल दाव्यातील भाग बोलताना ऐकू येतात. मात्र तत्पूर्वी “देशाच्या निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप झालेला आहे याचेही पुरावे देशाच्या संसदेत आलेले आहेत. आपण सगळे एकमेकांच्या विचाराचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे. पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणालातरी बंदूक ठेवायला देत आहेत याचं मला दुःख आहे. आपल्या खांद्यावर कोण बंदूक ठेवतंय याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी नानाभाऊ भारत जोडो आंदोलनावर बोललो, माझ्यावर काही लोकांनी टीका केली. आज पुराव्यासहित सांगतो, भारत जोडो आंदोलन, आंदोलन नव्हे अभियान, हे सन्माननीय राहुल गांधी यांनी सुरु केलं, मी त्याठिकाणी सांगितलं होतं की, या अभियानात कोण आहे जरा बघा… या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरोधात लढाई पुकारली नक्षलवादी काय करतात?” असे विचारून “नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही. भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही. भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही, आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचं आहे.” असे विधान ते करतात.
वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटना असल्याचा आरोप केला. फडणवीस पुढे म्हणाले, “ज्यावेळी देशात नक्षलवादाविरोधात मोठी लढाई सुरू झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात नक्षलवादी संपायला लागले. त्यावेळी हा नक्षलवाद शहरांमध्ये सुरू झाला.”१६-२८ वयापर्यंत प्रत्येकाच्या मनात क्रांतीची भावना असते, असं नमूद करत फडणवीस म्हणाले की, या वर्गाला पकडून त्यांच्यात अराजकतेचं रोपण करण्यासाठी तयार झालेल्या गुप्त गुन्हेगारी गटांना शहरी नक्षलवाद म्हटलं जाऊ लागलं. हे संविधानाचं नाव घेतात, पण संविधानानं तयार केलेल्या सर्व शासकीय संस्थांबद्दल लोकांमध्ये संशय तयार करतात आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे असं काम करतात,” असा आरोप फडणवीसांनी केला. हे आम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या युट्युब चॅनेलवरून सुद्धा संबंधित भाषण प्रसारित केले होते, यामध्ये संबंधित भाषणाची दीर्घ आवृत्ती आणि व्हायरल व्हिडिओचा भाग पाहायला मिळतो.
यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील नक्षलवाद्यांचे स्वरूप समजावून सांगताना केलेले विधान कापून चुकीच्या संदर्भाने व्हायरल केले जात असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असून तेथून प्रतिक्रिया मिळताच लेख अपडेट केला जाईल.
Conclusion
भारतीय संविधान आणि लोकशाहिवर विश्वास नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असे सांगणारा दावा चुकीच्या संदर्भाने व्हायरल करण्यात आला आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
Result: Missing Context
Our Sources
News published by BBC on December 20, 2024
Video published by TV9 Marathi on December 19, 2024
Video published by Devendra Fadnavis on December 19, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा