Friday, September 13, 2024
Friday, September 13, 2024

HomeFact CheckHealth and WellnessExplainer: जाणून घेऊया काय आहे H3N2 व्हायरस आणि या आजारात आयएमए अँटीबायोटिक्स...

Explainer: जाणून घेऊया काय आहे H3N2 व्हायरस आणि या आजारात आयएमए अँटीबायोटिक्स न वापरण्यास का सांगत आहे?

कोरोनाचे संकट देशासमोर आव्हान उभे करणारे ठरले. या संकटातून देश बाहेर पडतोय तोच आता H3N2 या नव्या फ्लूच्या रुग्णसंख्येत देशभरात वाढ होत आहे. देशभरातील रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी भरून जात आहेत. ताप, सर्दी, खोकला आणि फुफ्फुसाच्या आजारांनी रुग्णांना बेजार करून सोडले आहे. हा आजार संशोधकांच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय ठरला आहे. या आजाराचे स्वरूप काय आहे, त्याची लक्षणे कशी आहेत? आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी काय आहे? यासंदर्भातील माहिती आपण या एक्सप्लेनर च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

H3N2 काय आहे?

देशभरात चर्चेत आलेला H3N2 हा व्हायरस किंवा त्यामुळे होत असलेला आजार काय आहे? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला १२ सप्टेंबर २०१६ रोजी सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन ने प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट सापडला.

Explainer: जाणून घेऊया काय आहे H3N2 व्हायरस आणि या आजारात आयएमए अँटीबायोटिक्स न वापरण्यास का सांगत आहे?
Screengrab of cdc.gov

प्रामुख्याने डुकरांमध्ये प्रभावित होऊन संसर्गित होणारा हा रोग मानवामध्ये संक्रमित होत असल्याची माहिती आम्हाला या रिपोर्ट मध्ये मिळाली. यासंदर्भात आणखी शोध घेताना भारतात या रोगाचा प्रसार किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्हाला आयसीएमआर ने या रोगाची माहिती आणि लक्षणे यासंदर्भात दिलेली माहिती मिळाली. आयसीएमआर ने एक ट्विट करून ही माहिती दिल्याचे आमच्या निदर्शनास आले.

H3N2 हा फ्ल्यूचा ‘ए’ उपविभाग असल्याचे म्हटले आहे. आजवर आलेल्या फ्लूच्या व्हायरस मध्ये या व्हायरसची लागण झाल्यानंतर इस्पितळात दाखल व्हावे लागण्याचे प्रमाण अधिक आहे.

आयसीएमआर च्या म्हणण्यानुसार H3N2 ने इस्पितळात दाखल करावे लागलेल्या रुग्णांमध्ये ९२ टक्के रुग्णांना तापाची बाधा झाली होती. ८६ टक्के रुग्णांना खोकला आहे. २७ टक्के रुग्णांना श्वसनाची समस्या आहे तर १६ टक्के रुग्णांना घरघर आहे. यापुढे जाऊन या रुग्णांपैकी १६ टक्के रुग्णांना न्यूमोनियाची बाधा झाल्याचे आढळले असून त्यापुढील ६ टक्के रुग्ण फेफरे आणि चक्कर येण्याच्या विकारांनी त्रस्थ होऊ लागले आहेत.

मागील तीन महिन्यांपासून या विषाणूचा संसर्ग सुरु असल्याने इस्पितळात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचेही आयसीएमआर ने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भातील अनेक न्यूजरिपोर्ट्स आम्हाला पाहायला मिळाले. ते येथे, येथे आणि येथे पाहता येतील.

लक्षणे काय आहेत?

इन्फ्लूएंझा ए सबटाइप H3N2 मध्ये खोकला आणि सर्दीची लक्षणे पाहायला मिळतात. थंडी वाजणे आणि पोटात मळमळ यासारखी लक्षणे आहेत. याचा रुग्णांना जास्त त्रास होत आहे. हंगामी ताप येऊन तो सलग पाच ते सात दिवस टिकतो. यानंतर श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे, घरघर, न्यूमोनिया आणि फेफरे ही इतर काही लक्षणे आढळून येतात. यासंदर्भात आयसीएमआर ने दिलेली लक्षणांची माहिती आपण येथे पाहू शकता.

Explainer: जाणून घेऊया काय आहे H3N2 व्हायरस आणि या आजारात आयएमए अँटीबायोटिक्स न वापरण्यास का सांगत आहे?
Courtesy : Twitter@ICMRDELHI

हवा प्रदूषण प्रमुख दोषी

या आजाराच्या कारणांचा शोध घेत असताना आम्हाला द इकॉनॉमिक्स टाइम्स ने ४ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट मिळाला.

Explainer: जाणून घेऊया काय आहे H3N2 व्हायरस आणि या आजारात आयएमए अँटीबायोटिक्स न वापरण्यास का सांगत आहे?
Screengrab Of The Economics Times

यामध्ये आम्हाला या रोगाच्या संसर्गाचे प्रमुख कारण हवाप्रदूषण हेच असल्याचे वाचायला मिळाले. ताप तीन दिवसांनी निघून जातो पण खोकला तीन ते चार आठवडे टिकून राहतो. इंडियन मेडिकल असोशिएशन च्या स्थायी समितीनेही याला पुष्टी दिली आहे. १५ ते ५० वयोगटातील रुग्णांना विषाणूची लागण होऊन तापाच्या सोबतीने श्वसनाच्या दृष्टीने बाधा निर्माण होत असल्याचे आम्हाला वाचायला मिळाले.

काय करावे? काय टाळावे?

या विषाणूपासून होणाऱ्या आजारापासून वाचण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे याची सूचनावली सध्या घालून देण्यात आली आहे. आयसीएमआरने घालून दिलेल्या निर्धारित सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Explainer: जाणून घेऊया काय आहे H3N2 व्हायरस आणि या आजारात आयएमए अँटीबायोटिक्स न वापरण्यास का सांगत आहे?
Courtesy : Twitter@ICMRDELHI

साबण आणि पाण्याने आपले हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि अगदीच गरज पडल्यास मास्क चा वापर करावा, नाक शिंकरताना किंवा खोकताना तोंड आणि नाक बंद करून घ्यावे, शरीरात द्रव पदार्थ जास्त जातील याची काळजी घ्यावी, डोळे आणि नाकाला अकारण स्पर्श करू नये आणि अंगदुखी व ताप आल्यास पॅरासिटामोल गोळ्यांच्या वापर करावा. अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

हे टाळावे: एकमेकांशी संपर्क करताना हात मिळविणे किंवा आलिंगन देणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधे घेणे टाळावे तसेच जेवताना प्रमाणापेक्षा जवळ अर्थात एकत्रित बसणे टाळावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

अँटिबायोटिक्स टाळा: आयएमए चे आवाहन

एकीकडे रुग्ण वाढत आहेत आणि त्यांचे इस्पितळात दाखल होण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशावेळी सर्वसामान्य आणि लक्षणावर आधारित औषधे द्या आणि अँटिबायोटिक्स देणे टाळा अशी सूचना इंडियन मेडिकल असोशिएशन या डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने डॉक्टरांना केली आहे.

आयएमएने डॉक्टरांना अँटीबायोटिक्स नव्हे तर केवळ लक्षणात्मक उपचार लिहून देण्यास सांगितले आहे. “लोक अ‍ॅझिथ्रोमाइसिन आणि अमोक्सिक्लाव इत्यादीसारख्या प्रतिजैविकांचा वापर सुरु करतात. ही औषधे किती घ्यावीत आणि केंव्हा थांबावावीत याची काळजी न घेता हे सुरु होते. बरे वाटल्यावर ही औषधे तात्काळ थांबविणे आवश्यक असते, मात्र तसे होत नाही. यामुळे प्रतिकार शक्तीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे जेंव्हा शरीराला गरज असते तेंव्हा ही औषधे काम करू शकत नाहीत.” असे आयएमए ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही आय एम ए चे प्रमुख डॉ. सहजानंद सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “H3N2 या विषाणूच्या संसर्गाने रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र होणारे आजार हे आटोक्यात येणारे आणि बरे होणारे आहेत. रुग्णांनी जास्त घाबरून न जाता आणि अँटिबायोटिक्स च्या जाळ्यात न अडकता या आजारांना सामान्य लक्षणावर आधारीत उपचारांवर बरे होण्याची गरज आहे. लोक बरे होतील काळजी करू नका.” अशी माहिती दिली.

Conclusion

H3N2 विषाणूची लागण होत असून त्याचे रुग्णही वाढत आहेत. मात्र त्यावर आधारित लक्षणात्मक इलाजामुळे रुग्ण बरेही होत आहेत.

Our sources

Report published by cdc.gov on September 12, 2016

Tweet made by ICMR on March 3, 2023

Tweet made by IMA on March 3, 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular