Tuesday, December 24, 2024
Tuesday, December 24, 2024

HomeFact SheetsExplainerकर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?

कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि तिकीट वाटप सुरू असतानाच भाजप नेत्यांची पक्षांतराला सुरुवात केली. अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना भाजपने तिकीट नाकारल्याने बंडखोरीचा उद्रेक झाला. त्यामुळे नेत्यांनी एक एक करून भाजपला राजीनामे दिले आहेत. त्यापैकी बरेच विरोधी छावणीत सामील झाले आहेत. तेथे त्यांना त्यांच्या इच्छित मतदारसंघासाठीची तिकिटे मिळाली आहेत. तिकिटासाठी भाजप सोडणारे नेते कोण आहेत? रणांगणावर त्यांचा एकंदर प्रभाव कसा आहे, याची माहिती आपण जाणून घेऊया.

जगदीश शेट्टर

भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?
Image courtesy Twitter@ Jagadeesh Shetter

यावेळी भाजपने तिकीट न दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शेट्टर हे बनजिगा लिंगायत समाजाचे आहेत. हुबळी धारवाड मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बनजिगा लिंगायत समाजाचे जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये असताना ही पदे भूषवली आहेत.

१९९९ मध्ये विरोधी पक्षनेते

२००५ मध्ये भाजप चे राज्य अध्यक्ष

२००६ मध्ये जेडीएस सोबत युती सरकार असताना महसूल मंत्री

२०१२ मध्ये मुख्यमंत्री

शेट्टर हे लिंगायत समाजाचे असल्याने भाजपसाठी ते प्लस पॉइंट होते. यापूर्वी ज्या वेळी पंचमसाली आरक्षणाचा वाद आणि लिंगायतांना अधिक संधी अशी चर्चा झाली तेव्हा शेट्टर यांनी भाजपमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला.

आता जगदीश शेट्टर यांनी आपले मूळ घर सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हुबळी-धारवाडसह उत्तर कर्नाटकातील बलाढ्य लिंगायत समाजाचे नेते गमावल्याचा फटका भाजपाला बसला आहे. शेट्टर यांनी आपल्याला तिकीट न दिल्यास २५ जागा गमवाव्या लागतील, असा इशारा यापूर्वीच भाजपाला दिला होता. आता त्यांनी काँग्रेसच्या छावणीत उडी घेतल्याने काँग्रेसही उत्तर कर्नाटकात आपला दबदबा दाखवणार असल्याचे सांगत आहे.

लक्ष्मण सवदी

भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?
Courtesy: One India Kannada

माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे एमएलसी, शक्तिशाली लिंगायत समाजाचे नेते लक्ष्मण सवदी यांनी भाजपशी असलेले नाते सोडले असून त्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, असे बोलले जात आहे. २०१९ मध्ये येडियुरप्पा सरकारमध्ये सवदी हे उपमुख्यमंत्री होते. ते परिवहन मंत्रीही होते. २००४, २००८ आणि २०१३ मध्ये अथणीमधून विजयी झालेल्या सवदी यांना २०१८ मध्ये काँग्रेसच्या महेश कुमठळ्ळी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ते विधानपरिषद सदस्य अर्थात एमएलसी झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत कागवाड, अथणी (पोटनिवडणूक), सिंदगी आणि बसवकल्याण येथील भाजप उमेदवारांच्या विजयात सवदी यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यापूर्वी तेथे भाजपचे अस्तित्व नव्हते. सहकारी व स्थानिक संस्थांवर भाजपची पकड प्रस्थापित करण्याचे काम सवदी यांनी केले. सवदी हे गुलबर्गा, विजापूर येथील लोकप्रिय नेते आहेत. सीमाभागात तसेच महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर येथेही त्यांचा प्रभाव आहे.

अथणीत तिकीट न दिल्याने लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला गुडबाय केले. बेळगावात काँग्रेसची छावणी मजबूत करण्याचे काम ते करणार असल्याचे बोलले जात आहे. २०१२ मध्ये विधानसभेत ब्ल्यू फिल्म पाहिल्याचा आरोप सवदी यांच्यावर झाला होता. यामुळे भाजपची मान शरमेने खाली गेली होती आणि विरोधी काँग्रेसने त्यांच्यावर बरीच टीका केली होती. आता त्याच काँग्रेसने त्यांना आपल्यात सामावून घेतले आहे.

डॉ. ए. बी. मलकारेड्डी

भाजप सोडून जेडीएस मध्ये प्रवेश

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?

पाचवेळा काँग्रेसचे आमदार ए.बी. मलकारेड्डी यांनी या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात उडी घेतली असेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी वैयक्तिक वैर असल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी सोयरीक जुळविली होती. मलाकारेड्डी यांना यावेळी यादगिरीतून तिकीटाची अपेक्षा होती आणि त्यांचे नाव यादीत येईल अशी अपेक्षा होती. ८७ वर्षीय मलकारेड्डी यांचा भाजपने विचार केला नाही. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे तिकीट मागितले पण तेथे डाळ शिजली नाही. त्यानंतर त्यांनी जेडीएसला विचारले आणि तिकीट मिळाले. मलकारेड्डी भाजपमधून बाहेर पडल्याने यादगिरीत पक्षाच्या बाजूने निवडणूक रणनीती आखण्यात अनेक आव्हाने येऊ शकतात. ८७ वर्षांच्या वृद्धांना तिकीट न द्यायचे नाही या नियमामुळे भाजपने तिकिटासाठी दुसऱ्याला प्राधान्य देण्याचे धोरण राबविले. यामुळेच मलकारेड्डी यांना तिकीट नाकारले गेले. मात्र काहीही करून तिकीट मिळवीत त्यांनी आता आपली सोयरीक जेडीएस शी जुळविली आहे.

नेहरू ओलेकर

भाजप सोडून जेडीएस मध्ये प्रवेश

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?
Courtesy: Twitter@ManjuBangadi2

नेहरू ओलेकर हे हावेरी विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ इच्छुक होते. हावेरी हा अनुसूचित जातीचा राखीव मतदारसंघ आहे जिथून त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची योजना आखली होती. अलीकडेच बेंगळुरू पीपल्स कोर्टाने आमदार नेहरू ओलेकर आणि त्यांच्या दोन मुलांसह पाच जणांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजारांचा दंड ठोठावला. २०१२ मध्ये पालिकेच्या कामात ५ कोटी रुपयांचा भ्रष्ठाचार केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा झाली. ओलेकर यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयाकडून मनाई हुकूम आणला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपने ओलेकरांना थोडे दूर केले. ओलेकर ऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे प्रयत्न झाले. यामुळेच आता ओलेकर जेडीएसमध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांच्या भाजपमधून बाहेर पडण्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल असे बोलले जात आहे.

गुलिहट्टी शेखर

भाजपाला रामराम, अपक्ष वाटचाल

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?
Courtesy: Prajavani

चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा मतदारसंघातील भाजपचे आमदार, गुलीहट्टी शेखर यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनच राजकारणात प्रवेश केला. २००८ मध्ये त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि २०१८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व आमदार म्हणून निवडून आले. अनुसूचित जातीतील गुलीहट्टी यांना होसदुर्ग मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवायची होती. मात्र यावेळी भाजपने त्यांना तिकीट दिले नाही.

२०१८ मध्ये गुलीहट्टी शेखर हे काँग्रेसच्या ताब्यातील जागा भाजपला देण्यात यशस्वी झाले होते. यासाठी ते प्रसिद्धच आहेत. आता तिकीट गमवावे लागल्याने त्यांना अपक्ष निवडणूक लढवायची आहे, भाजपसाठी हा टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे. असे बोलले जात आहे.

एम पी कुमारस्वामी

भाजप सोडून जेडीएस मध्ये दाखल

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?
Courtesy: The Indian Express

भाजपकडून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले एम पी कुमारस्वामी हे मुदिगेरेचे आमदार आहेत. त्यांना या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळाले नाही. चेक बाऊन्सशी संबंधित आठ वेगवेगळ्या फौजदारी खटल्यांमध्ये नुकतेच आरोपी ठरलेल्या कुमारस्वामी यांना लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने तक्रारदाराला १.३६ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. यात कुचराई झाल्यास सहा महिने कारावास भोगावा लागेल, असे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी भाजप नेते येडियुरप्पा मतदारसंघात आले होते, तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांनी येडियुरप्पा यांच्या गाडीसमोर उभे राहून कुमारस्वामी यांना तिकीट देण्यास विरोध केला होता. त्यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, तत्पूर्वी कुमारस्वामी भाजपला विजयी करण्यात यशस्वी ठरले होते. आता कुमारस्वामी यांना जेडीएसचे तिकीट मिळाले असून त्यांनी भाजपला राजीनामा दिला आहे.

सूर्यकांत नागमरपल्ली

भाजप सोडून जेडीएस मध्ये

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?
Courtesy: Prajavani

२००९ च्या पोटनिवडणुकीत आणि २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीदर उत्तर मतदारसंघातून भाजपकडून लढलेल्या सूर्यकांत नागमरपल्ली यांचा सलग दोनदा पराभव झाला. २०२३ मध्ये ही जागा जिंकण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या सतत संपर्कात राहून पक्ष संघटन वाढविले होते. मात्र, भाजपने बीदर उत्तरमधून सूर्यकांत नागमरपल्ली यांना तिकीट देण्यास नकार दिला आणि दुसरे इच्छुक ईश्वरसिंग ठाकूर यांना तिकीट दिले. यामुळे सूर्यकांत जेडीएसमध्ये दाखल झाले आहेत.

सूर्यकांत नागमरापल्ली यांचे वडील गुरुपादप्पा नागमरपल्ली जनता दलात होते आणि १९८९ आणि १९९४ मध्ये मंत्री होते. संघटनेच्या दृष्टीने भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या सूर्यकांत यांनी पक्ष सोडणे भाजपसाठी धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोनदा संधी दिली असताना अपेक्षित निकाल न दिल्याने भाजपने दुसऱ्याची निवड केल्याचे बोलले जात आहे.

विरोधी छावणीत गेलेले इतर नेते

विरोधी छावणीत गेलेल्या भाजपच्या इतर नेत्यांमध्ये माजी आमदार, शाहपूरचे इच्छुक गुरुपाटील शिरवाल यांचा समावेश आहे. ते जेडीएस मध्ये दाखल झाले आहेत. कोल्हेगालचे माजी आमदार, भाजप एससी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नंजुंडा स्वामी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विजापूरचे माजी आमदार मनोहर ऐनापुरे काँग्रेसच्या छावणीत दाखल झाले आहेत.

Our Sources

Report by Economic Times , Dated: April 15, 2023

Report by NDTV , Dated: April 17, 2023 

Report by Hindustan Times Dated: April 14, 2023

Report by Asianet Suvarnanews , Dated: April 16, 2023

Report by Asianet Suvarnanews , Dated: April 16, 2023

Report by, Vijayakarnataka , Dated: April 14, 2023

Report by Varthabharathi , Dated: April 14, 2023

Report by One India , Dated: April 17, 2023


(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर कन्नड साठी ईश्वरचंद्र बी जी यांनी केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular