Authors
मागील आठवडा अनेक खोट्या दाव्यान्नी गाजला. १५ जानेवारी पासून कोरोनामुळे शाळा कॉलेजने सुट्टी दिली जाणार असा एक दावा व्हायरल झाला. भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी मांसाहार आणि मद्यावर यथेच्छ ताव मारत आहेत असे सांगणारा एक फोटो व्हायरल करण्यात आला होता. ख्रिश्चनांवर हल्ले केल्यास १० वर्षे शिक्षा होईल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे किंवा चलनी नोटेवर काहीही लिहिल्यास ती नोट अवैध ठरविली जाते असे दावे व्हायरल झाले. विवेक अग्निहोत्रींच्या दी काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे ऑस्कर साठी नामांकन झाल्याचा दावाही मोठ्याप्रमाणात पसरविण्यात येत आहे. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
काश्मीर फाईल्स चे ऑस्कर नामांकन झाले?
दी काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन झाल्याचा दावा आणि नामांकन झाल्यानंतर अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. आमच्या तपासात हे दावे खोटे आणि चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले.
राहुल गांधींनी यावर ताव मारला नाही
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत मांसाहार आणि मद्यावर ताव मारल्याचे सांगत एक फोटो व्हायरल करण्यात आला होता. आमच्या तपासात हा फोटो संपादित असल्याचे स्पष्ट झाले.
२० दिवस शाळा कॉलेजना सुट्टी?
कोविड चा विस्तार वाढत असून त्याला रोख लावण्यासाठी लॉकडाऊन सारखी परिस्थिती येईल व शाळा कॉलेजने २० दिवस सुट्टी देण्यात आली आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
या गुन्ह्याला १० वर्षे शिक्षा नाही
ख्रिश्चन समुदायावर हल्ले करणाऱ्यांना १० वर्षे शिक्षा भोगावी लागणार असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याचा दावा करण्यात येत आहे. आमच्या तपासात हा दावा निव्वळ खोटा असल्याचे दिसून आले.
तर नोट अवैध ठरते?
कोणत्याही प्रकारे चलनी नोटेवर लिहिले गेल्यास ती नोट अवैध ठरविली जाते असा दावा करण्यात येत आहे. मात्र आमच्या तपासात असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे आणि हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in