Claim–
अमेरिकेने 19 फेब्रुवारी हा जागतिक छत्रपती दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले तसेच 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील छापला आहे.

Verification –
सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर आम्हाला एक पोस्ट आढळून आली. यात म्हटले आहे की भारतासाठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे अमेरिकेने घोषित केले आहे की 19 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती दिन म्हणून पाळला जावा कारण या दिवशी जगतविख्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. याबद्दल अमेरिकेचे विशेष आभार हा संदेश आपणास जेवढा पसरविता येईल जेवढा पसरवा.भारताला मिळालेला हा शिवराय यांच्यामुळे आणखी एक मोठा सम्मान आहे. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जे काम भारतात व्हायला पाहिजे होते ते काम अमेरिकेने करुन दाखवले. असा संदेश या पोस्टमध्ये असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेली 100 डाॅलरच्या नोटाचा फोटो देखील यात शेअर करण्यात आला आहे.
अमेरिकेने खरंच छत्रपती दिनाची घोषणा केली आहे का आणि शिवाजी महाराजांची 100 डाॅलरची नोट छापली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र आम्हाला अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही. अमेरिकेने जर खरंच असा काही निर्णय घेतला असता तर ती मोठी बातमी ठरली असती मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमांत किंवा भारतीय माध्यमांत अशी बातमी आढळली नाही.
अमेरिकेत एखादा विशेष दिन घोषित करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला देण्यात आला आहे. अमेरिकेच्या कोड ऑफ रेग्युलेशन 19.4 नुसार, अमेरिकेत विशेष दिन अथवा कार्यक्रम घोषित करण्यात येतो. मात्र यासाठी किमान 60 दिवसांच्या आधी व्हाईट हाऊसमधील मेनेजमेंट व बजेट ऑफिसचे संचालकांकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. मग तो प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांकडे पाठवला जातो. राष्ट्राध्यक्षांच्या सही नंतर त्याची घोषणा करण्यात येते. जागतिक दिन ठरवण्याचा अधिकार अमेरिकेला नाही, संयुक्त राष्ट्रातर्फे (UN) जागतिक दिन घोषित करण्यात येतात.
विकीपीडियामध्ये अमेरिकेतील राष्ट्रीय दिनांची यादी दिली आहे या यादीत छत्रपती दिनाचा उल्लेख नाही.

यावरुन हेच स्पष्ट होते की अमेरिकेने छत्रपती दिनाची घोषणा केलेली नाही मग 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आले कसे असा प्रश्न पडतो. आम्ही याबाबत पडताळणी करण्यास सुरुवात केली. गूगलवर काही किवर्डसच्या सहाय्याने शोध घेतला असता आम्हाला आढळले की अमेरिकेत 1914 मध्ये सर्वप्रथम शंभर डॉलरची नोट चलनात आली. त्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती राहिलेले बेंजमिन फ्रँकलिन यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत नोटेवर बेंजमिन फ्रँकलिन यांचाच फोटो कायम ठेवण्यात आला. आहे.

मात्र आम्ही शोध सुरुच ठेवला असता अशी एक वेबसाईट आढळून आली यात तुम्ही तुमचा फोटो देखील 100 डाॅलरच्या नोटेवर छापू शकता अशी सोय करण्यात आली आहे. या नोटेचा नंबर मात्र एकच आहे. त्याच नंबरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र छापण्यात आले आहे. याचा अर्थ ती खरी नोट नाही.


यावरुन हेच स्पष्ट होते की, अमेरिकेने 19 फेब्रुवारीला छत्रपति दिन घोषित केलेला नाही शिवाय 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र छापलेले नाही. सोशल मीडिया खोटी पोस्ट व्हायरल होत आहे.
Tools Used
Google Keywords Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)