Authors
पठाण चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाने आणि त्यासंदर्भातील विविध पोस्टनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अंबानी कुटुंबीयांनी अभिनेता शाहरुख खान सोबत पठाण चित्रपट पाहिला असा दावा करण्यात आला. बीबीसी वाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित वादग्रस्त डॉक्युमेंटरी प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर या डॉक्युमेंटरीच्या निर्मात्याची भेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात घेतल्याचा दावा करण्यात आला. भारताचे आर्थिक स्थैर्य चांगले झाल्यामुळेच आम्हाला जी २० परिषदेचे यजमानपद मिळाले असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. लाडली फौंडेशन मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करते हा दावा असो किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅकर्स व्हिडीओ पाठवून लुटू शकतात हा दावा असो. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
अंबानी कुटुंबाने पाहिला नाही ‘पठाण’
अभिनेता शाहरुख खान सोबत अंबानी कुटुंबीयांनी पठाण चित्रपट पाहिला असा दावा एका फोटोच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
राहुल गांधी त्या निर्मात्याला भेटले?
काँग्रेस नेते राहुल गांधी सहा महिन्यापूर्वीच वादग्रस्थ डॉक्युमेंटरीच्या निर्मात्याला भेटले होते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
जी २० चे यजमानपद अर्थव्यवस्थेवर आधारित नाही
भारताला जी २० चे आयोजन करण्याची संधी वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे मिळाली असा दावा खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. हा दावा चुकीचा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
लाडली फौंडेशन खासगी लग्नांना मदत देते?
लाडली फौंडेशन ही संस्था गरीब पालकांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत देते, असा दावा करण्यात आला. आम्ही केलेल्या तपासात ही संस्था अशी कोणतीही मदत देत नसल्याचे स्पष्ट झाले.
व्हिडीओ पाठवून हॅकिंग करता येत नाही
मोबाईलवर व्हिडीओ पाठवून तुमचा फोन, क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅक केले जात आहे, असा एक मेसेज जोरदार व्हायरल झाला. आमच्या तपासात अशापद्धतीने हॅकिंग करता येत नसल्याचे दिसून आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in