Sunday, June 16, 2024
Sunday, June 16, 2024

HomeFact Checkकबर पाडली म्हणून जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळले? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ आत्ताचा...

कबर पाडली म्हणून जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळले? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ आत्ताचा म्हणून व्हायरल

राष्ठ्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. हर हर महादेव चित्रपट प्रकरण असो किंवा त्यांच्यावर झालेली विनयभंगाची केस असो ते चांगलेच गाजत आहेत. यामुळे त्यांच्याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. “जितू मिया यांना अफजलखान याची कबर तोडल्यावर झालेलं दुःख” या कॅप्शन खाली त्यांचा एक रडतानाचा व्हिडीओ सध्या व्हाट्सअप वर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आपण खाली पाहू शकता.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हाट्सअप वर अनेकांनी शेयर केला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवताली वाढलेली अतिक्रमणे सातारा जिल्हा प्रशासनाने हटविली. हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केले आणि याचे जितेंद्र आव्हाड यांना इतके वाईट वाटले कि त्यांना रडू कोसळले अशा अर्थाने ही पोस्ट व्हायरल होताना दिसली.

व्हाट्सअप ग्रुपवरील स्क्रिनशॉट

Fact Check/Verification

आम्ही हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे शोधण्यासाठी किवर्ड सर्च केला. “जितेंद्र आव्हाड रडू कोसळले” अशा किवर्ड च्या माध्यमातून शोधल्यावर आम्हाला Just Middle-class Youtuber या चॅनेलवर हा व्हिडीओ आढळून आला.

युट्युब चॅनेलवरील स्क्रिनशॉट

आम्ही त्या चॅनेलवरील त्या व्हिडीओचे तपशील तपासण्याचा प्रयत्न केला असता, तो व्हिडीओ ३० नोव्हेंबर २०१९ रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. आपण तो ओरिजनल व्हिडीओ पाहिला असता त्यात जितेंद्र आव्हाड रडताना दिसत आहेत. कालच्या घटनेनं खूप दुःख झालं या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं आहे. “साहेबांचा अर्थात शरद पवार यांचा त्रास बघून खूप त्रास होतो हो, राजकारण गेलं खड्ड्यात असे विधान त्यांनी केले आहे.” या व्हिडिओत कुठेही अफजलखान, त्याची कबर, कबर पाडली याचं दुःख झालं अशा कोणत्याही शब्दांचा उल्लेख आढळत नाही.

यानंतर आम्ही थेट जितेंद्र आव्हाढ यांच्याशीच संपर्क साधला आणि ही मुलाखत आपण कधी आणि कोणत्या संदर्भात दिली होती? असा प्रश्न केला असता, “अजित पवार देवेंद्र फडणवीस सोबत गेले होते तेंव्हाच” अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. आम्हाला संदर्भ लक्षात आला. शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षालाच खिंडार पडल्याचीही स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळले आणि त्यांनी साहेबांना त्रास होतो याचे वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तो शपथविधी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे झाला होता.

Courtesy: ABP Live

त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०१९ ला जितेंद्र आव्हाड यांनी ही मुलाखत दिल्याचे आणि ती ३० नोव्हेंबर ला अपलोड झाल्याचे निदर्शनास आले. “अजित पवार राष्ट्रवादीत आहेत की नाही माहीत नाही, पदावरुन काढल्यामुळे अजित पवार आता गटनेतेही नाहीत, राष्ट्रवादीच्या भूमिकेत भविष्यातही कधी बदल होणार नाही” अशी प्रतिक्रिया त्यांनी २४ नोव्हेंबर २०१९ रोजी माध्यमांना दिली होती. याबाबत एबीपी माझा ने आपल्या अधिकृत हॅन्डल वरून केलेले ट्विट आम्हाला मिळाले. व्हायरल व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी घातलेला शर्ट आणि त्या ट्विट मधील शर्ट सारखाच आहे. यावरून व्हिडीओ जुना असल्याचे दिसून येते.

महत्वाचे म्हणजे अफजल खान याची प्रताप गड येथील कबर नव्हे तर त्या भोवताली असलेली अनधिकृत अतिक्रमणे पाडविण्यात आली आहेत. ही घटना अगदी अलीकडची म्हणजेच याच महिन्यातील असून १० नोव्हेंबर २०२२ रोजी याबद्दल अनेक बातम्या छापून आल्या आहेत.

Conclusion

अफजल खान ची कबर नव्हे तर त्याभोवतालची अनधिकृत अतिक्रमणे पाडविण्यात आली आहेत. ही घटना ताजी असताना जितेंद्र आव्हाड यांचा दोन वर्षे जुना व्हिडीओ घेऊन त्याला कबर पाडविल्याने रडू कोसळले असा अर्थ देण्याचा खोटा दावा करण्यात आला असल्याचे आमच्या तपासात उघड झाले आहे.

Result: False

Our Sources

Video published by youtube chanel Just middle-cast publisher on November 30,2019

News published by ABP Live

News published by Lokmat on Novenber 10,2022

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular