Friday, September 20, 2024
Friday, September 20, 2024

HomeFact Checkकाय गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच सोडतो?...

काय गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच सोडतो? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे

गाय ही हिंदू धर्मात माता म्हणून पुजली जाते. गाय आणि तिचे विविध गुणधर्म वारंवार पूजिले जातात. कामधेनू म्हणून ओळखली जाणारी गाय हा असा एकमेव प्राणी आहे की जी श्वसन करताना ऑक्सिजन आतमध्ये घेऊन ऑक्सिजनच बाहेर सोडते असा एक दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भातील अनेक पोस्ट आपण फेसबुक आणि ट्विटर वर पाहू शकता.

Courtesy: Facebook/Rohit Godbole

Fact Check/Verification

गाय ऑक्सिजन देते का? यासंदर्भात आम्ही तथ्य तपासणी करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला ऑक्सिजन सोडणाऱ्या झाडांविषयी माहिती मिळाली. अनेक झाडे रात्रीच्या वेळी ऑक्सिजन देतात आणि त्याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावर चांगला परिणाम होतो अशी माहिती आम्हाला Floweraura या वेबसाईटवर मिळाली. रात्रीच्या वेळी कार्बनडाय ऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडण्याचा हा झाडांचा गुणधर्म अनेक शास्त्रज्ञांनीही सिद्ध केला आहे. मात्र जीवित प्राण्यांबद्दल असे बोललेले कुठेही आढळले नाही.

Screengrab of Floweraura

गाय ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन सोडते का? हे शोधताना आम्हाला बीबीसी ने केलेला एक रिपोर्ट आढळला. मानव आणि प्राण्यांची श्वसन संस्था नेमकी कशी असते याची माहिती त्यामध्ये आहे. माणूस असो वा कोणताही प्राणी त्याच्या श्वसन यंत्रणेत ऑक्सिजन घेणे आणि उत्सर्जनाचे प्रमाण किती असते याची माहिती आम्हाला britannica.com वर मिळाली.

Screengrab of britannica.com

“श्वसन प्रणाली ही सजीवांच्या शरीरातील एक प्रणाली आहे जी ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन घेते आणि कार्बन डायऑक्साइड सोडते. सजीवांमध्ये, कार्बन डायऑक्साइडसह, कार्बन असलेल्या रेणूंच्या ऑक्सिडेशनद्वारे ऊर्जा मुक्त होते.” अशीच माहिती आम्हाला प्राप्त झाली.

यावर आणखी संशोधन करण्यासाठी आम्ही पशुवैद्यकीय खात्याचे सहाय्यक संचालक डॉ. आनंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,” मानव असो वा कोणताही प्राणी असो, श्वसन प्रक्रिया एक समान प्रक्रिया आहे. ती सामान्यपणे जगण्यासाठी लागणार ऑक्सिजन आतमध्ये अर्थात फुफ्फुसा पर्यंत घेऊन जाते आणि त्यामधील अनावश्यक घटक अर्थात कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडते ” असे त्यांनी सांगितले. या बाहेर सोडल्या जाणारी कार्बन डाय ऑक्साइड सोबत काहीप्रमाणात ऑक्सिजन बाहेर पडतो का? गायीसारख्या काही प्राण्यात ऑक्सिजन बाहेर सोडण्याचे गुणधर्म आहेत का? असा प्रश्न केला असता, ” हे पूर्णपणे चुकीचे असें तसे गुणधर्म कोणत्याही प्राण्यात नसतात.” हेच त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव, ज्यांनी २०२१ साली गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले पाहिजे, असे ठळक केले होते, त्याच आदेशात म्हटले आहे की शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की गाय हा एकमेव प्राणी आहे जो श्वास घेतो आणि ऑक्सिजन सोडतो.यानंतर काही राजकीय व्यक्तींनीही असे दावे जाहीर भाषणात केल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

2017 मध्ये राजस्थान सरकारमधील शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी दावा केला होता. गायीला ऑक्सिजन सोडणे हे वरदान प्राप्त आहे, असे त्यांनी म्हटले होते. अशाअनेक पोस्ट तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील.

श्वासात घेतलेल्या हवेत 21 टक्के ऑक्सिजन असतो तर 16 टक्के ऑक्सिजन श्वास सोडलेल्या हवेत असतो. बीबीसीच्या अहवालात असेही नमूद केले आहे की आपण 0.04 टक्के कार्बन डायऑक्साइड आत घेतो, तर श्वास सोडलेल्या हवेत 4 टक्के हा वायू असतो.

गायीची म्हणता सांगताना अनेक अवैज्ञानिक दावे केले जातात असे अनेक वैद्यांनीही स्पष्ट केले आहे. एकलव्य या साप्ताहिकात याबद्दल डॉ. डी बालसुब्रमण्यम यांचा लेख बरीच माहिती देतो. कोरा च्या अनेक चर्चासत्रांमध्ये गाय हा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन सोडतो हे चुकीचे असल्याचे जाणकारांनी सिद्ध करून सांगितले आहे.

गायीच्या या विशिष्ट गुणधर्माबद्दल आम्हाला कोठेही विशेष संशोधन झाल्याचे किंवा एकाद्या शास्त्रज्ञाने तसे सिद्ध केल्याचे आढळले नाही.

Conclusion

गाय हा इतर सजीव प्राण्यांप्रमाणेच एक प्राणी असून श्वसन करताना जसे इतर प्राणी काही प्रमाणात ऑक्सिजन सोडतात तसेच गुणधर्म गायीच्या बाबतीतही आढळतात हेच आमच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे श्वसन करताना गाय हा एकमेव प्राणी ऑक्सिजन सोडतो हा दावा पूर्णपणे खोटा आहे.

Result: False

Our Sources

Report published by britannica.com

Report published by BBC

Article made by Floweraura

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular