Tuesday, June 25, 2024
Tuesday, June 25, 2024

HomeFact Check२०२३ ची ही वैशिष्ठये खरी आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे

२०२३ ची ही वैशिष्ठये खरी आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे

जुन्या २०२२ या वर्षाला निरोप आणि नव्या २०२३ या वर्षाचे स्वागत या उंबरठ्यावर फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर सोशल माध्यमांवर २०२३ या वर्षाची वैशिष्ठे सांगणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. “नवीन वर्षात प्रत्येक महिन्यात एका विशिष्ठ तारखेला शुक्रवार येणार, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चारवेळा येणार असल्याने हा महिना वेगळा ठरणार आणि असे वेगळेपण यानंतर ८२३ वर्षांनी पाहायला मिळणार” असा दावा या मेसेजमधून केला जात आहे.

२०२३ ची ही वैशिष्ठये खरी आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: Facebook/ Raghunath Upadhye

हा मेसेज व्हाट्सअप च्या माध्यमातून जोरदार पसरत असून तो व्हायरल करण्याचा दावा केला जात असल्याने अनेकजण पुढे फॉरवर्ड करू लागले आहेत. तो संदेश असा आहे.

“उत्कृष्ट माहिती (२०२३) या वर्षी 01-01-2023 शुक्रवार, 02-02-2023 शुक्रवार, 03-03-2023 शुक्रवार, 04-04-2023 शुक्रवार

05-05-2023 शुक्रवार, 06-06-2023 शुक्रवार, 07-07-2023 शुक्रवार, 08-08-2023 शुक्रवार, 09-09-2023 शुक्रवार, 10-10-2023 शुक्रवार, 11-11-2023 शुक्रवार, 12-12-2023 शुक्रवार

हा येणारा फेब्रुवारी हा शेवटचा फेब्रुवारी आहे जो आता जिवंत दिसेल. याचे कारण असे आहे की या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पुढील 823 वर्षांतून एकदाच घडते. येत्या फेब्रुवारीमध्ये:

4 रविवार, 4 सोमवार, 4 मंगळवार, 4 बुधवार, 4 गुरुवार, 4 शुक्रवार, 4 शनिवार.

याला म्हणतात MiracleIn.

म्हणून किमान 5 लोक किंवा 5 गट पाठवा, आणि 4 दिवसात चमत्कार होईल.

अवर्णनीय चमत्कारांवर आधारित. वाचल्यानंतर 11 मिनिटांच्या आत पाठवा.

मी हे 5 पेक्षा जास्त लोकांना पाठवले आहे.”

नवीन वर्षात प्रत्येक महिन्यात एका विशिष्ठ तारखेला शुक्रवार येणार, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चारवेळा येणार असल्याने हा महिना वेगळा ठरणार आणि असे वेगळेपण यानंतर ८२३ वर्षांनी पाहायला मिळणार
Courtesy: Screengrab of viral Whatsapp message

Fact Check/ Verification

सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असलेल्या या दाव्यामध्ये अनेक पोट दावे असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यामुळे आम्ही दाव्यानुसार पडताळणी करण्याचा प्रयत्न केला.

दर महिन्यात विशिष्ट तारखेला येतो शुक्रवार?

या मेसेज मध्ये पहिला दावा होता तो २०२३ या वर्षी दर महिन्यात विशिष्ठ तारखेला शुक्रवार येतो असा. त्या त्या महिन्याचा क्रम असलेल्या तारखेला प्रत्येक महिन्यात शुक्रवार हा वार येत असल्याचा दावा खरा आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही शोध घेतला. जानेवारीला १, फेब्रुवारीला २, मार्च ला ३ याप्रमाणे डिसेंबरला १२ तारखेला शुक्रवार असणे या दाव्याप्रमाणे गरजेचे होते. यासाठी आम्ही अनेक ऑनलाईन कॅलेंडर्स तपासली. गुगल कॅलेंडर वर आम्ही प्रत्येक महिन्याचा क्रम आणि दाव्यात सांगितल्याप्रमाणे तारीख तपासून पाहिली असता काही योगायोग वगळता हा दावा कुठेही जुळत नसल्याचे आमच्या लक्षात आले. timeanddate या स्वतंत्र वेबसाईटवरही आम्हाला अशीच माहिती मिळाली.

प्रत्येक महिन्यातील तारखेचा संदर्भ तपासला असता, २०२३ वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा दावा खोटा ठरत असल्याचे लक्षात येते. दाव्याप्रमाणे १ जानेवारी २०२३ रोजी शुक्रवार असणे गरजेचे आहे. मात्र ३१ डिसेंबर २०२२ रोजी शनिवार असून १ जानेवारीला रविवार आला आहे. दाते पंचांग पाहिला तर आपल्याला हे लक्षात येते.

नवीन वर्षात प्रत्येक महिन्यात एका विशिष्ठ तारखेला शुक्रवार येणार, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चारवेळा येणार असल्याने हा महिना वेगळा ठरणार आणि असे वेगळेपण यानंतर ८२३ वर्षांनी पाहायला मिळणार
Screengrab of Date Panchang

गुगल कॅलेंडर प्रमाणे संपूर्ण वर्षाचा अंदाज घेतला असता केवळ, ३ मार्च, ५ मे आणि ७ जुलै रोजी शुक्रवार आला असून तो दाव्यात सांगितल्याप्रमाणे चमत्कार नसून निव्वळ योगायोग असल्याचे आमच्या लक्षात आले.

८२३ वर्षांनी येणार असा फेब्रुवारी?

व्हायरल मेसेज मध्ये २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक वार चारवेळा आला असून असा योग आणखी ८२३ वर्षांनी पाहायला मिळणार…. असा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात आम्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांच्याशी संपर्क साधला. या दाव्यासंदर्भात बोलताना “त्यांनी आम्हाला लीप वर्ष वगळता इतर प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतात. आठवड्याचे वार सात आहेत आणि महिन्याचे एकूण दिवस २८ असतील तेंव्हा साता चोक अठ्ठावीस या न्यायाने प्रत्येक वार चारवेळा येणे हे स्वाभाविक आहे.” अशी माहिती त्यांनी दिली. “याच कारणाने फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रत्येक वार ४ वेळा येणार आहे. यात कोणताही चमत्कार नाही.” असे त्यांनी सांगितले.

नवीन वर्षात प्रत्येक महिन्यात एका विशिष्ठ तारखेला शुक्रवार येणार, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चारवेळा येणार असल्याने हा महिना वेगळा ठरणार आणि असे वेगळेपण यानंतर ८२३ वर्षांनी पाहायला मिळणार
Screengrab of Date Dindarshika

मोहनराव दाते यांनी यापुढे बोलताना, ” हा कोणताही योगायोग नाही आणि असा योग यापुढे ८२३ वर्षांनी होणार असे म्हणणे निव्वळ मूर्खपणा असल्याचे सांगितले. लीप वर्ष संपल्यानंतर सलग तीन वर्षे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार हा चारवेळा येत असतो. त्यानंतर आलेल्या लीप वर्षी फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असल्याने कोणतातरी एक वार पाचवेळा आणि इतर सहा वार चार वेळाच येतात. नसते चमत्कार दाखविण्यासाठी काही लोक असे गणिती नियम बदलून घोळ घालतात आणि बरेच लोक यावर विश्वास देखील ठेवतात, याचे आश्चर्य वाटते. नागरिकांनी कॅलेंडर उघडून बघावे. नसत्या गोष्ठीवर विश्वास ठेऊ नये.” असे सांगितले. “आता २०२४ या लीप वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक वार पाचवेळा येईल. त्यानंतर २०२५, २०२६ आणि २०२७ मध्ये परत प्रत्येक वार चारवेळा अशीच फेब्रुवारी महिन्याची स्थिती असेल. यापूर्वी २०२१ आणि २०२२ मध्येही फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चार वेळा आला आहे.” असेही सांगून त्यांनी याचा पुरावाही न्यूजचेकर कडे सादर केला.

Conclusion

अशाप्रकारे न्यूजचेकर ने केलेल्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, उत्कृष्ट माहिती या सदराखाली शेयर केला जात असलेला संदेश निव्वळ खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. लीप वर्ष वगळता प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चारवेळा येतो. आणि २०२३ या वर्षी महिन्याच्या क्रमाने येणाऱ्या तारखेला प्रत्येक महिन्यात शुक्रवार येत असल्याचा दावाही खोटा आहे. हा खोटा संदेश पाच ग्रुप किंवा पाच व्यक्तींना पाठविल्यावर कोणता चमत्कार होणार हे समजणे सुद्धा या मेसेज प्रमाणेच चमत्कारिकच आहे.

Result: False

Our Sources

Google calendar for the year 2023

2023 calendar published by timeanddate.com

Conversation with Mohanrao Date, publisher of Date Panchang

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular