Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
व्हिडिओत भाजप आमदार अनिल उपाध्याय आहेत.
हा व्हिडीओ एक अनोळखी व्यक्तीचा असून भाजप आमदाराचा नाही.
“ये मेरे हमसफर…..” या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर अर्धनग्न अवस्थेत नृत्य करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत भाजप आमदार असल्याचा दावा आहे.
भाजप आमदार अनिल उपाध्याय यांचा हा व्हिडीओ असल्याचे सांगत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा दावा केला जात आहे.



“भाजप आमदार अनिल उपाध्याय यांच्या या विधानावर मोदीजी काय म्हणतील” तसेच “खरंच भारत देश महाशक्तीकडे चाललाय” अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ शेयर केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
आम्ही सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या तपासासाठी रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून शोध घेताना आम्हाला हा व्हिडीओ Desh India Live या युट्युब चॅनेलने १६ ऑक्टोबर २०१९ रोजी शेयर करताना “भाजप आमदार योगेश पाटील” अशी मूळ इंग्रजी भाषेतील कॅप्शन वापरली असल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे या व्हिडिओत व्हायरल व्हिडिओप्रमाणे बॅकग्राउंड म्युजिक “ये मेरे हमसफर….” या गाण्याचे नसून “गोलमाल है भाई सब गोलमाल है…..” या गाण्याचे असल्याचे आम्हाला दिसून आले. यावरून सध्या व्हायरल व्हिडिओतील बॅकग्राउंड संगीत बदलण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.
व्हायरल व्हिडिओबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्ही भाजपमध्ये अनिल उपाध्याय नावाचा कोणी आमदार आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतातील निवडणुका लढवलेल्या आणि जिंकलेल्या राजकारण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस असलेल्या Myneta.info वर इंग्रजीत ‘अनिल उपाध्याय’ या कीवर्डचा वापर करून शोध घेतल्यावर असे दिसून आले की अनिल उपाध्याय या नावाचे एकूण ३ आमदार उमेदवार संस्थेच्या डेटाबेसमध्ये आहेत. यापैकी दोन नोंदी दिवंगत अंबिका प्रसाद उपाध्याय यांचे पुत्र अनिल कुमार उपाध्याय यांच्याशी संबंधित आहेत. अनिल कुमार उपाध्याय नावाच्या व्यक्तीने २००७ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे लखनौ मध्य आणि लखनौ कॅन्ट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. तिसरी नोंद डॉ. अनिल उपाध्याय नावाच्या उमेदवाराची आहे, ज्यांनी २०१८ मध्ये राजस्थानच्या जोधपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

दरम्यान आम्ही काही कीवर्डस शोधले असता आम्हाला यापूर्वी अनेकदा अनिल उपाध्याय हे नाव फक्त भाजपच नव्हे तर इतर पक्षाशी जोडून अनेक प्रकारचे दावे करण्यात आलेले असल्याचे निदर्शनास आले.
यासंदर्भात न्यूजचेकर हिंदीने १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केलेले फॅक्ट चेक आपण येथे वाचू शकता.
यामध्ये उपलब्ध माहितीनुसार,
काँग्रेस आमदार अनिल उपाध्याय यांनी विविध निदर्शने आणि आंदोलनांसाठी स्वतःच्याच पक्षावर टीका केली या दाव्यावरील न्यूजचेकरचे फॅक्ट चेक येथे वाचता येईल.
रिपब्लिक भारत न्यूज चॅनलने चालवलेल्या ‘काँग्रेस आमदार अनिल उपाध्याय यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली’ या बातमीवरील न्यूजचेकरचे फॅक्ट चेक येथे वाचता येईल.
भाजप आमदार अनिल उपाध्याय यांच्याकडून हरणाची शिकार बद्दल शेअर केलेल्या दाव्यावरील न्यूजचेकरचे फॅक्ट चेक येथे वाचता येईल.
भाजप आमदार अनिल उपाध्याय यांनी एका पोलिसाला मारहाण केल्याबद्दल शेअर केलेल्या दाव्यावरील न्यूजचेकरचे फॅक्ट चेक येथे वाचता येईल.
भाजप आमदार अनिल उपाध्याय यांनी महिलांचा विनयभंग केल्यानंतर एका पोलिसाला मारहाण केल्याबद्दल शेअर केलेल्या दाव्यावरील न्यूजचेकरचे फॅक्ट चेक येथे वाचता येईल.
यावरून आमच्या लक्षात आले की अनिल उपाध्याय हे नाव वापरणाऱ्यांनी २०२२ पूर्वीही अनेक खोटे दावे शेयर केले आहेत.
दरम्यान व्हायरल व्हिडिओत असणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा तपास आम्ही लावू शकलेलो नाही. सदर अज्ञात व्यक्ती भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षाशी संबंधीत नसल्याचे आणि आमदार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट होते की ‘भाजप आमदार अनिल उपाध्याय यांनी अश्लील नृत्य केले’ असा दावा करून सोशल मीडिया युजर्सनी शेअर केलेला हा व्हिडिओ प्रत्यक्षात एका अज्ञात व्यक्तीचा आहे. खरं तर, भाजपमध्ये अनिल उपाध्याय नावाचा कोणताही आमदार सध्या नाही व यापूर्वीही झालेला नाही.
Our Sources
Video published by Desh India Live on October 16, 2019
Myneta.info
Reference various fact checks done by Newschecker.In