Tuesday, November 5, 2024
Tuesday, November 5, 2024

HomeFact Checkएमएसएमई उद्यम नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

एमएसएमई उद्यम नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

कोणताही व्यवसाय किंवा उद्योगाची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी भारत सरकारचे एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून कार्यरत आहे. या मंत्रालयाच्या वेबसाईटची लिंक असल्याचे सांगून एक मेसेज सध्या व्हायरल झाला आहे. तुमच्या उद्योगाची नोंदणी करा आणि ई उद्यम प्रमाणपत्र मिळवा. असे हा मेसेज सांगत असून हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित लिंक दिलेल्या वेबसाईटवर पैसे मागितले जात असल्याचा प्रकार घडत आहे. सध्या व्हाट्सअप च्या माध्यमातून हा संदेश व्हायरल झाला आहे.

eudyogaadhaar.org ही वेबसाईट तुमच्या व्यवसायाची नोंदणी देश पातळीवर करते
Whatsapp viral message

“eudyogaadhaar.org ही वेबसाईट तुमच्या व्यवसायाची नोंदणी देश पातळीवर करते. आजच नोंदणी करा आणि अधिकृत व्यावसायिक बाणा. कर भरा, देश वाचावा …. हिच आमची इच्छा….भारत सरकार द्वारा प्रमाणित…..” असे हा संदेश सांगतो.

Fact Check/ Verification

या मेसेज सोबत लिहिलेला मराठी मधील संदेश आम्हाला संशयास्पद वाटल्याने आम्ही या वेबसाईटवर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही ‘eudyogaadhaar.org’ या लिंक वर जाऊन संबंधित वेबसाईट पाहिली. त्यावेळी आम्हाला त्यामध्ये ई उद्यम प्रमाणपत्रासाठी लागणारी माहिती विचारणारे अनेक रकाने दिसले.

eudyogaadhaar.org ही वेबसाईट तुमच्या व्यवसायाची नोंदणी देश पातळीवर करते
Screengrab of eudyogaadhaar.org

आम्ही संपूर्ण वेबसाईट पाहिली असता संशय निर्माण होण्यासारखी एक माहिती समोर आली. व्हायरल मेसेज मध्ये ही वेबसाईट तुमच्या व्यवसायाची नोंदणी अधिकृतपणे करते असे सांगून खाली भारत सरकार द्वारा प्रमाणित असे म्हटलेले होते. मात्र आम्हाला या वेबसाईटवर शोधताना ही वेबसाईट सरकारी नसून ‘एक आयएसओ प्रमाणित कन्सल्टन्सी संस्था’ असल्याचे निदर्शनास आले.

eudyogaadhaar.org ही वेबसाईट तुमच्या व्यवसायाची नोंदणी देश पातळीवर करते
Screengrab of eudyogaadhaar.org

सरकारी वेबसाईट असल्याचे सांगून कोणीतरी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा संशय आम्हाला आला. यासाठी आम्ही या वेबसाईटची अधिकृतता तपासण्यासाठी सायबर तज्ज्ञ हितेश धरमदासानी यांच्याशी संपर्क साधला. ” लिंक पाहिल्यावरच ही वेबसाईट सरकारी नसल्याचे लक्षात येते.” असे त्यांनी सांगितले. “साधारणपणे सर्व सरकारी साइट्सचे डोमेन .gov.in वर संपत असतात, ‘.org’ हे डोमेन बिगर सरकारी आणि खासगी संस्थांना मिळते. दरम्यान सरकारी वेबसाईट असे सांगण्यात आल्यास सर्वप्रथम डोमेन तपासावे असा सल्ला त्यांनी दिला.”

“अशाप्रकारे सरकारी कामासाठीही वेबसाईट खासगी पातळीवर तयार करून त्यासाठी कागदपत्रे जमविणे किंवा प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी करणे हा प्रकार निव्वळ फसवणुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘eudyogaadhaar.org’ ही लिंक आणि वेबसाईट म्हणजे एकाच सर्व्हर आणि आयपी अड्रेस चा वापर करून वेगवेगळ्या नावांनी फसवणूक करण्याचा प्रकार आहे. हे लोक लोकांचा डेटा गोळा करतात,काही बनावट सेवांच्या नावाखाली पैशांची लूट करतात किंवा दस्तऐवजाच्या प्रती गोळा करून तुमच्या नावे नंतर बनावट कामासाठी वापरू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही त्यांना आधार प्रत दिली तर ते तुमच्या नावावर सिम कार्ड मिळवण्यासाठी ते वापरू शकतात. या सिमकार्ड चा अनेक बनावट कामांसाठी वापर केला जाऊ शकतो.” हे धोके त्यांनी सांगितले.

” याच सर्व्हर आणि आयपी अड्रेस चा वापर करून संबंधितांनी यापूर्वी passport-sahayata.org, gemprocessing.org, foodlicenceonline.com अशा लिंक आणि वेगवेगळ्या वेबसाईट डिझाईन करून बरीच आर्थिक लूट केली असल्याचे निदर्शनास आलेले असून .org डोमेन असलेल्या अशा कोणत्याही लिंकवर कधीही आपली गोपनीय कागदपत्रे अपलोड करणे धोक्याचे असल्याचे” हितेश यांनी न्यूजचेकरला सांगितले.

यानंतर आम्ही ई उद्यम नोंदणी संदर्भात आणखी शोध घेतला असता पीआयबी फॅक्टचेक ने याच संदर्भात केलेले ट्विट आम्हाला सापडले.

या ट्विट मध्ये आम्हाला ‘http://eudyogaadhaar.org‘ ही लिंक आणि तिची वेबसाईट बनावट असून हे प्रमाणपत्र काढण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी ‘https://udyamregistration.gov.in‘ या अधिकृत वेबसाईटचा अवलंब करण्याची सूचना करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन शोध घेतला असता आम्हाला हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणतेही पैसे लागत नसल्याचे तसेच आधार क्रमांक वगळता इतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नसल्याचे पाहायला मिळाले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात उद्यम नोंदणी आणि प्रमाणपत्रासाठी ‘https://udyamregistration.gov.in‘ ही अधिकृत वेबसाईट असल्याचे आणि या प्रक्रियांसाठी विनामूल्य सेवा एमएसएमई मंत्रालय देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources


Official website of MSME

Tweet made by PIB Factcheck

Conversation with cyber expert Hitesh Dharamdasani


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular