महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आठवडाभरात असंख्य फेक दावे झाले. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत, त्यांनी वरळीतून माघार घेतली, असा दावा करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आलेली पहिल्या इन्स्टोलमेंटची पुण्यात जप्त केलेली रक्कम, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले, असा दावा करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाराज झाले असून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा दावा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या दाव्यात आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनासुद्धा लक्ष करण्यात आले आहे. नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा असाच दावा करण्यात आला आहे. मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे हा दावा सांगतो.
शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत सध्या एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.