Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkवीजबिल न भरल्यास तुमचा वीजपुरवठा खंडित होईल असा मेसेज आला आहे? व्हायरल...

वीजबिल न भरल्यास तुमचा वीजपुरवठा खंडित होईल असा मेसेज आला आहे? व्हायरल मेसेज एक स्कॅम आहे

‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’. असे मेसेज पाठवून महावितरण च्या वीज ग्राहकांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. अनेक ग्राहकांना संदेश पाठवून असे आवाहन केले जात आहे की, आपण संबंधित क्रमांकांवर तातडीने संपर्क न साधल्यास आपला वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविली आहे. हे मेसेज अर्थात एस एम एस मोबाईल क्रमांकावर थेट येतात. संबंधित क्रमांकांवर संपर्क साधल्यास एखादे अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले जाते किंवा काहीवेळा पैशांची मागणी होते. यामुळे वीजग्राहक संभ्रमात आहेत.

Screengrab of SMS

अश्या प्रकारचे संदेश मोठ्याप्रमाणात पसरत आहेत. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातही हेच प्रकार पाहावयास मिळाले आहेत.

Fact Check/Verification

हा प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरण शी संबंधित असल्याने आम्ही तपासणीसाठी सर्वप्रथम महावितरण च्या अधिकृत वेबसाईट वर संपर्क साधला. त्याठिकाणी आम्हाला एक जाहीर प्रकटन सापडले.

Screengrab from official website of MSEB

बनावट एस एम एस कडे दुर्लक्ष करा असे जाहीर आवाहन महावितरण ने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून केले आहे. यासंदर्भात महावितरण च्या फेसबुक पेज वर सुद्धा आम्हाला बरीच माहिती मिळाली. अशा प्रकारचे संदेश आले तर घ्यावयाच्या काळजी बरोबरच आर्थिक फसवणूक झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, पोलीस स्थानकात तक्रार कशी द्यावी आदी माहिती तेथे आढळून आली.

Screengrab of Facebook post

याचबरोबरीने महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध मराठी दैनिकात महावितरण ने जाहिराती देऊन या फसवणुकी बद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Screengrab of Sakal News Paper

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महावितरण च्या कोल्हापूर आणि कोकण परिमंडळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता, त्यांनी विस्तृत माहिती दिली. हे एस एम एस हा एक फसवणुकीचा प्रकार असून त्याबद्दल आम्ही राज्य पातळीवर सायबर गुन्हेगारी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. आम्ही ग्राहकांमध्ये जागृती करण्याचे अनेक उपक्रम राबविले आहेत. ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की, ” महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही. वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे पुन्हा प्रकार घडत आहेत. या मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठविण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी या बनावट मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे.” असे त्यांनी सांगितले.

तसेच “महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. परंतु, सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे. त्यास प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करून नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.” अशीही माहिती त्यांनी दिली.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात वीजग्राहकांना येणारे एस एम एस पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि खोटे असल्याचे आढळले आहेत. या मेसेज च्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचा उद्देश असून असे प्रकार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही सुरु आहेत. ग्राहकांनी याबद्दल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Result: False

Our Sources

Public notice published by official website of MSEB

Advertisement published by MSEB in Sakal Newspaper


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular