Authors
Claim
व्हाट्सअप वर येणाऱ्या शुभेच्छा संदेशांमध्ये हॅकर्सनी घातलेल्या फिशिंग कोड मुळे युजर्सची वैयक्तिक माहिती धोक्यात आहे.
Fact
इमेज किंवा व्हिडीओ मेसेजमधून असा कोणताही धोका होत नाही. सदर मेसेज दिशाभूल करणारा आहे.
उद्यापासून, कृपया नेटवर्क चित्रे पाठवू नका. असे सांगणारा एक भलामोठा टेक्स्ट मेसेज सध्या व्हाट्सअपवर फिरू लागला आहे. हॅकर्स फिशिंग कोड घालून शुभेच्छा संदेश बाहेर पाठवीत आहेत. हा मेसेज स्वीकारणाऱ्यास आणि पुढे पाठविल्यानंतर इतरांसाठी धोक्याचा ठरू शकतो. कारण या फिशिंग कोडमुळे प्रत्येकाची वैयक्तिक बँकिंग माहिती उघड होऊ शकते. असे हा मेसेज सांगतो. फेसबुकवरही अनेक युजर्स हा मेसेज पोस्ट करीत आहेत.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
“”500,000 हून अधिक पीडितांची फसवणूक झाल्याची नोंद आहे. तुम्हाला इतरांना नमस्कार सांगायचे असल्यास, कृपया तुमच्या स्वतःच्या शुभेच्छा लिहा आणि तुमचे स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पाठवा जेणेकरून तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे संरक्षण करू शकाल. महत्वाचे! सुरक्षित राहण्यासाठी, कृपया तुमच्या फोनवरील सर्व शुभेच्छा आणि चित्रे हटवण्याची खात्री करा. जर कोणी तुम्हाला अशा प्रतिमा पाठवल्या असतील, तर त्या ताबडतोब तुमच्या डिव्हाइसवरून काढून टाका. कोणताही अनधिकृत घुसखोरी थांबवण्यासाठी हा संदेश तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईक आणि मित्रांना पाठवा!!! व्वा!!! प्रिय कुटुंब आणि मित्र सावध रहा !!” असे हा मेसेज सांगतो.
Fact check/ Verification
सदर मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असल्याने आम्ही त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मेसेजच्या सुरुवातीलाच “ओल्गा निकोलायव्हनास वकिलाकडून चेतावणी” असा उल्लेख असल्याने आम्ही अशा कोणत्या वाकोलाने अशी चेतावणी दिली आहे का? याचा शोध घेतला. की वर्ड सर्च च्या माध्यमातून शोध घेतल्यावर आम्हाला या नावाची व्यक्ती किंवा त्या व्यक्तीने दिलेली चेतावणी याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र आम्हाला याच मेसेजच्या मूळ इंग्रजी आवृत्तींकडे नेले.
यावरून हा मराठी मेसेज मूळ इंग्रजी भाषेतील मेसेजचे भाषांतर असल्याचे दिसून आले.
मेसेजमध्ये “शांघाय चायना इंटरनॅशनल न्यूजने” हा मेसेज जारी केला असल्याचेही आम्हाला वाचायला मिळाले. आम्ही असे कोणते मीडिया पोर्टल आहे का? याचा शोध घेतला. मात्र आम्हाला असे कोणतेही न्यूज पोर्टल आढळले नाही. आम्ही केलेल्या तपासात आम्हाला Shanghai Eye, China Plus News, South China Sea News, China Daily Asia, SHINE (Shanghai Daily) अशी न्यूज पोर्टल आढळली. मात्र यापैकी कोणीही असा अलर्ट किंवा संदेश दिल्याचे जाणवले नाही.
एकाद्या प्रकारे हॅकर्स कडून मोठ्याप्रमाणात धोका किंवा संकट येणार असल्यास कोणती यंत्रणा त्याबद्दल सूचना देते का? याचा शोध आम्ही घेतला. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या Indian Computer Emergency Response Team CERT-In कडून अशा सूचना दिल्या जातात अशी माहिती आम्हाला मिळाली. तेथे जाऊनही शोध घेतल्यावर अशाप्रकारचा अलर्ट दिल्याचे आम्हाला दिसून आले नाही.
भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरही आम्ही पाहणी केली. मात्र आम्हाला अशी कोणतीही सूचना दिल्याचे पाहावयास मिळाले नाही.
सदर मेसेज अधिकृतरीत्या कोणी दिला आहे किंवा प्रसारित केला आहे, यासंदर्भात आम्हाला कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. तसेच तो मेसेज व्याकरणाच्या दृष्टीनेही पाहता गोंधळ आणि संशय निर्माण करणारा वाटला.
यामुळे आम्ही यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञ हितेश धरमदासानी यांच्याशी संपर्क केला. व्हाट्सअप वर येणाऱ्या गुड मॉर्निंग सारख्या शुभेच्छा संदेशातून फिशिंग कोड येऊ शकतो का? अशा संदेशातून आपली खासगी माहिती धोक्यात येते का? हे आम्ही त्यांना विचारले. त्यांनी ” व्हाट्सअप वर इमेज मेसेज स्वीकारण्याने मोबाईल हॅक करता येऊ शकत नाही. जोपर्यंत अज्ञात मार्गातून प्राप्त झालेली एकादी लिंक तुम्ही उघडत नाही तोपर्यंत हा धोका नसतो. लिंक च्या माध्यमातून तुमची माहिती चोरली जाऊ शकते. मात्र लिखित संदेश किंवा संदेशाच्या इमेज मधून असा प्रकार होऊ शकत नाही. हॅकर्स लिंक चा वापर अशा प्रकारासाठी करतात. दरम्यान शुभेच्छा संदेश जे टेक्स्ट किंवा इमेज च्या माध्यमातून येतात आणि ज्यांना कोणतीही लिंक जोडलेली नसते, अशा संदेशांपासून घाबरण्याची कोणतीच गरज नाही.” असे त्यांनी सांगितले. यामुळेच “व्हायरल संदेश दिशाभूल करणारा असल्याचे” त्यांनी स्पष्ट केले.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात व्हाट्सअप वर आलेल्या शुभेच्छा संदेशांचा माध्यमातून फिशिंग कोड पाठवून वैयक्तिक माहिती चोरली जावू शकते असे सांगणारा व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
Result: False
Our Sources
Official Twitter handle of @IndianCERT
Official Website of Ministry of Electronics & Information Technology
Conversation with Cyber Security Expert Hitesh Dharmdasani
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in