Authors
Claim
₹५०० च्या नोटा चलनातून बंद होणार आहेत.
Fact
हा दावा खोटा आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याचा इन्कार केला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच ₹५०० च्या नोटा चलनातून बंद करणार आहे. असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून हा संदेश पसरविला जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact check/ Verification
न्यूजचेकरने या दाव्याचा तपास करण्याचा निर्णय घेतला. अनेकांमध्ये संभ्रम पसरविणाऱ्या या मेसेजमध्ये ₹५०० च्या नोटा चलनातून बंद करणार अशी घोषणा नेमकी कुणी केली याचा उल्लेख आढळला नाही. काही मेसेजमध्ये ५ मे पासून ₹५०० च्या नोटा बंद होणार असे म्हटले होते तर काही मेसेजमध्ये लवकरच असे म्हणून तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती. दरम्यान आम्ही यासंदर्भात काही मीडिया रिपोर्ट्स मिळतात का याचा शोध घेऊन पाहिला मात्र काहीच हाती लागले नाही.
यासंदर्भात किवर्ड सर्च केला असता ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा बंद करण्यासंदर्भातील निर्णय घेतल्याच्या बातम्या आम्हाला आढळल्या. मात्र असा नवा कोणताही निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आम्हाला मिळाली नाही.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर आम्ही शोध घेतला. मात्र असा कोणताही निर्णय घेण्यात आला असल्याचे आमच्या पाहणीत आले नाही. इतका मोठा निर्णय घेण्यात आला असेल तर त्याबद्दल केंद्राचे अर्थ खाते आणि मीडिया रिपोर्टमध्ये काहीतरी विधाने आली असती. मात्र तसे काहीच नव्हते.
नोटबंदी किंवा नवीन नोटा चलनात आणण्यासंदर्भात कोणताही निर्णय आणि अंमलबजावणी भारतीय रिझर्व्ह बँक करते. दरम्यान यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने कोणती घोषणा केली आहे का? यासंदर्भात आम्ही शोध घेतला. रिझर्व्ह बँकेचे अधिकृत ट्विटर हॅन्डल आम्ही तपासून पाहिले मात्र नोटबंदी किंवा नवीन नोटांची अंमलबजावणी याबद्दल कोणतीही माहिती आम्हाला मिळाली नाही.
अखेर आम्ही अर्थ मंत्रालयाच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाच्या, कॉर्पोरेट व्यवहार, समन्वय विभागाच्या डायरेक्टर जनरल प्रग्या पालीवाल गौर यांच्याशी संपर्क साधला असता, “हा मेसेज पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याची माहिती त्यांनी दिली.” अशा मेसेजवर कुणीही विश्वास ठेऊ नका. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Conclusion
₹५०० च्या नोटा चलनातून बंद करणार असे सांगत व्हायरल होणारा मेसेज खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Official Website of Cental Finance Department
Twitter Handle of RBI
Conversation with Director General of Media & Communication Division of Finance Ministry, Corporate Affairs, Coordination Pragya Paliwal Gaur
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in