Authors
Claim
लष्कराचे जवान, प्रवासी आदींनी धक्का देऊन ट्रेन सुरू केली, त्यानंतर ट्रेन पुढे सरकली.
Fact
दावा दिशाभूल करणारा आहे. ट्रेनच्या एका भागात आग लागली होती, त्यामुळे तिथे उपस्थित लोकांनी ट्रेनचा एक भाग ढकलून आगीच्या भागापासून वेगळा केला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लष्कराचे जवान, रेल्वे कर्मचारी आणि सामान्य लोक ट्रेनच्या डब्याला धक्का देताना दिसत आहेत. नव्या भारतामध्ये धक्का देऊन ट्रेन सुरू करावी लागत आहे असा दावा करत व्हिडिओ शेअर केला जात आहे.
07 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील हावडा येथून तेलंगणातील सिकंदराबादसाठी निघालेल्या फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे हैदराबादपासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या बोम्मईपल्ली आणि पागिडीपल्ली दरम्यान ट्रेन थांबवावी लागली. सर्व प्रवासी वेळेत ट्रेनमधून उतरले असून यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Fact Check/ Verification
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केले. आम्हाला 10 जुलै रोजी एनडीटीव्ही च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. त्यात व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनग्राब आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हावडाहून सिकंदराबादला जाणाऱ्या फलकनुमा एक्स्प्रेसचा हा व्हिडिओ आहे. पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी जळत्या ट्रेनच्या डब्याला ढकलताना दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे लिहिले आहे की, ट्रेनला आग लागल्याने एस-2 ते एस-6 डब्यांचे नुकसान झाले आहे. आग इतर डब्यांमध्ये पसरू नये म्हणून ट्रेनमधून काही डबे वेगळे करण्यात आले. यामध्ये रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने डबे बाहेर काढण्यात आले.
शिवाय, आम्हाला 7 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान टाईम्स वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सीएच राकेश यांनी सांगितले की, “फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन आरक्षित बोगींमध्ये आग लागली आणि सकाळी 11.30 च्या सुमारास बोम्मईपल्ले आणि पागीडीपल्ले दरम्यानच्या इतर बोगींमध्ये पसरली. त्यानंतर काही प्रवाशांनी तिकीट तपासणी कर्मचार्यांना याची माहिती दिली, त्यांनी तात्काळ पायलटला सावध करण्यासाठी साखळी ओढली. या दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. S4, S5 आणि S6 या तिन्ही बोगी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत तर शेजारील बोगीचे अंशत: नुकसान झाले आहे. आग आणखी पसरू नये म्हणून आगीमुळे बाधित बोगी तात्काळ इतर बोगींपासून वेगळ्या करण्यात आल्या.”
तपासादरम्यान, आम्हाला रेल्वे प्रवक्ता रेल्वेच्या (Spokesperson Railways) अधिकृत हँडलवरून 10 जुलै रोजी एक ट्विट आढळले. फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आग आणखी पसरू नये म्हणून डबे वेगळे करण्यात मदत करण्यासाठी एक इंजिन पाठवण्यात आले, परंतु इंजिन येण्याची वाट पाहण्याऐवजी रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस कर्मचारी तात्काळ कृतीत उतरले.
याशिवाय, दक्षिण मध्य रेल्वेनेही अधिकृत हँडलवरून ट्विट केले आहे की ते ट्रेन क्रमांक 12703 (हावडा-सिकंदराबाद) मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेशी संबंधित आहे. आग आणखी पसरू नये म्हणून रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने मागील डबे वेगळे करण्याच्या निर्णयाबाबत व्हिडिओमध्ये आहे. इंजिनच्या मदतीची वाट न पाहता ही आपत्कालीन कारवाई होती.
Conclusion
अशा प्रकारे, फलकनुमा एक्स्प्रेसमधील आग आणखी पसरू नये म्हणून रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या आपत्कालीन कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल झाल्याचे आमच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.
Result: Missing Context
Our Sources
Report Published by NDTV on July 10, 2023
Report Published by Hindustan Times on July 07,2023
Tweet by Spokesperson Railways on July 10,2023
Tweet by South Central Railways on July 10, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in